
येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे: प्रत्यक्ष जागेवर जाऊन जमिनीची मोजणी न करता बनावट ‘क’ प्रत तयार केल्याप्रकरणी हवेली भूमिअभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक आणि एका कर्मचाऱ्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरसिंह रामचंद्र पाटील आणि विरेंद्र संपतराव कोकरे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत स्वप्नील अशोक भोरडे (वय ३५, रा. औंध) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाटील हे हवेली भूमिअभिलेख कार्यालयात उपअधीक्षकपदी कार्यरत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जुन २०२४ या दरम्यान आरोपींनी जमिनीच्या मोजणी प्रकरणात प्रत्यक्षात जागेवर जाऊन मोजणी केली नाही. तसेच बनावट ‘क’ प्रत तयार केली. त्याद्वारे दुसऱ्या व्यक्तीला लाभ देऊन तक्रारदार यांचे नुकसान केले,असे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याआधीही अमरसिंह रामचंद्र पाटील आणि भुकरमापक किरण येटाळे यांनी जमिनीच्या मोजणीनंतर हद्द निश्चित करण्यासाठी व्यावसायिकाकडे तब्बल ५० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा झाला होता. लाच न दिल्यास पाटील यांनी तक्रारदार यांना ‘हेलिकाॅप्टर शाॅट’ लावण्याची म्हणजेच, मालमत्तेचे नुकसान करण्याची धमकी दिली होती.