
शासकीय ठेकेदाराकडे मागितली अडीच लाखांची लाच : तीन अधिकाऱ्यांवर लाचलुचपतकडून कारवाई
#पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांमध्ये भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली असून हे अधिकारी ठेकेदारांकडून २ टक्के प्रमाणे लाखों रुपये उकळत असल्याचे उघड झाले आहे. एका शासकीय ठेकेदाराने केलेल्या दौंड तालुक्यातील खुटबाव रोड ते गलांडवाडी पांदन शिव रस्ता व गलांडवाडी मंदिर ते ज्ञानदेव कदम घर रस्ता या कामाचे बिल अदा करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल २ लाख ५४ हजारांची लाच मागीतल्याचे प्रकरण समोर आले आहे. यातील १ लाख ४२ हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिघांजणांना रंगेहात पकडले.
जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग (दक्षिण) कार्यकारी अभियंता, बाबुराव कृष्णा पवार (वय ५७), दौंड शिरुर उपविभागाचे उपअभियंता दत्तात्रेय भगवानराव पठारे, दौंड उपविभागाच्या कनिष्ठ अभियंता अंजली प्रमोद बगाडे अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय ठेकेदाराने तक्रार दाखल केली आहे. एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शासकीय ठेकेदार आहेत. ते त्यांच्या फर्मच्या नावाने शासकीय टेंडर घेत असतात. कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग (दक्षिण) जिल्हा परिषद यांनी दौंड तालुक्यातील खुटबाव रोड ते गलांडवाडी पांदन शिव रस्ता व गलांडवाडी मंदिर ते ज्ञानदेव कदम घर रस्ता या कामाची निविदा सप्टेंबर २०२४ मध्ये प्रसिद्ध केली होती. तक्रारदार यांना या दोन कामाचे कार्यादेश (वर्कऑर्डर) मिळाली होती. या कामाच्या रक्कमेमध्ये जीएसटी व इतर कर असे दोन्ही कामाच्या बिलाची रक्कम ४० लाख रुपये होत आहे.
काम पूर्ण झाल्यानंतर ३ मार्च २०२५ रोजी यातील कनिष्ठ अभियंता अंजली बगाडे यांनी तक्रारदाराने केलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन जिल्हा परिषदेची एसक्युएम कमिटी केलेल्या कामाची पाहणी करुन अहवाल देईल. त्यासाठी त्या कमिटीकरीता प्रत्येक कामापोटी ७ हजार रुपये असे तक्रारदाराच्या दोन कामाकरीता १४ हजार रुपये लाचेची मागणी केली. तसेच, तक्रारदाराच्या दोन कामाच्या बिलाची फाईल तयार करुन मंजूरीसाठी ऑनलाईन सादर करण्यासाठी कामाच्या बिलाच्या रक्कमेच्या २ टक्के प्रमाणे ८० हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली.
त्यानंतर तक्रारदार उपअभियंता दत्तात्रेय पठारे याला भेटले. त्यांनी तक्रारदाराकडे दोन कामाच्या बिलाची फाईल तपासुन ती फाईल वरिष्ठ अधिकारी बाबुराव पवार याच्याकडे पाठवण्यासाठी कामाच्या बिलाच्या रक्कमेच्या २ टक्के प्रमाणे म्हणजे ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर, तक्रारदार यांनी कार्यकारी अभियंता बाबुराव पवार याची भेट घेतली. त्यानेसुद्धा तक्रारदाराकडे दोन कामाच्या बिलाची फाईल मंजूर करण्याकरीता व बिल देण्याकरीता कामाच्या बिलाच्या रक्कमेच्या २ टक्के प्रमाणे म्हणजे ८० हजार रुपये लाचेची मागणी केली.
याबाबत संबंधित ठेकेदाराने एसीबीकडे १० मार्च २०२५ रोजी तक्रार दाखल केली. त्यानुसार, ११ मार्च २०२५ रोजी आरोपींची पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी झाली. त्यामध्ये बगाडे हिने १४ हजार रुपयांची, तसेच पठारे याने तडजोडीअंती ६४ हजार रुपयांची, तर पवार याने ६४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, ऐन होळीच्या दिवशीच १३ मार्च रोजी सापळा लावण्यात आला. त्यावेळी, पवार याला ६४ हजार, पठारे याला ६४ हजार आणि बगाडे हिला १४ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.
कार्यकारी अभियंता बाबुराव पवारच्या बॅगेत घबाड
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ज्यावेळी कार्यकारी अभियंता बाबुराव पवार याच्यावर सापळा रचून कारवाई केली; त्यावेळी त्याच्या बॅगेत पोलिसांना घबाड आढळून आले. त्याच्या शासकीय दालनामध्ये ठेवलेल्या त्याच्या बॅगेमध्ये तब्बल ८ लाख ५८ हजार ४०० रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे. ही रक्कम तपासासाठी ताब्यात घेण्यात आली असून, त्याबाबत चौकशी सुरु असल्याचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले.