
जीएसटी विभागाकडून डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : बांधकाम व्यवसायिक अमित थेपडे यांच्यावर अंमलबजावणी संचालयाने केलेल्या कारवाईनंतर पुणे पोलिसांनी देखील मोठी कारवाई केली आहे. त्यांच्यावर मूल्यवर्धित कराची (व्हॅट) थकबाकी न भरता जीएसटी विभागाची ४ कोटी ३ लाखांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित अशोक थेपडे (रा. विष्णुप्रसाद बिल्डिंग, भांडारकर रोड, एरंडवणे) असे गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यवसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी जीएसटी विभागाच्यावतीने सुशांत शिवाजी रेडेकर (रा. हाऊसिंग बोर्ड, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. थेपडे यांच्यावर भारतीय दंडविधान ४२० सह मूल्यवर्धित कर कायदा २००२ च्या कलम ७४ (२), ७४ (३) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा सर्व प्रकार एप्रिल २०१३ ते जून २०१७ या कालावधी दरम्यान घडला.
थेपडे यांच्याकडे यांच्या मालकीच्या नोंदणीकृत कंपनीने मूल्यवर्धित कर अर्थात व्हॅट थकवलेला होता. तब्बल चार कोटी तीन लाख ६० हजार ४०० रुपयांची ही थकबाकी भरण्यासंदर्भात त्यांना वारंवार कायदेशीर नोटीसा बजावण्यात आलेल्या होत्या. मात्र, त्यांनी या नोटीसांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. तसेच थकबाकीची रक्कम न भरता वस्तू व सेवा कर विभागाची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
#PuneNews #PuneUpdates #BreakingNews #GSTFraud #VATScam #PunePolice #AmitThepde #MaharashtraNews #BuilderNews #EconomicOffence #PuneCity #CrimeNews #LatestUpdates #MarathiNews