
दोन दादांमध्ये पुन्हा रस्सीखेच : संभाव्य मंत्र्यांच्या व्हायरल झालेल्या यादीत दिग्गजांच्या नावांना कात्री?
#पुणे : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर महायुतीमधील रंगलेले राजकीय नाराजीनाट्य शपथविधी सोहळ्यानंतर थांबले. मात्र, मंत्रीपद वाटप आणि मंत्रालयावरुन तीनही पक्षांमध्ये चर्चाचर्वण सुरू आहे. येत्या १५ डिसेंबर रोजी मंत्रीमंडळ विस्तार आणि नवीन मंत्र्यांच्या शपथविधी होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. संभाव्य मंत्र्यांची एक यादी देखील समाज माध्यमावर व्हायरल झाली असून यामध्ये दिग्गजांच्या नावाला कात्री लावण्यात आल्याचे संकेत मिळत आहेत. त्यातही पुण्याचे पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दीड वर्षांपूर्वी जिल्ह्यातील दोन दादांमध्ये रंगलेला पालकमंत्रीपदाचा डाव पुन्हा एकदा रंगला आहे. पुण्याचे पालक उपमुख्यमंत्री अजित पवार होणार की चंद्रकांत पाटील होणार याविषयी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
राज्यात २०१९ साली घडलेल्या सत्तानाट्यानंतर पुण्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे आले होते. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले पवार पुण्यात दर शुक्रवार किंवा शनिवारी आढावा बैठक घेत असत. विशेषत: कोविड कालावधीत ते नित्यनेमाने ही बैठक घेत असत. शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि शिवसेना-भाजपाचे सरकार आले. या सत्तांतरानंतर कोथरूडचे आमदार बनलेले चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री झाले. त्यानंतर अवघ्या एक वर्षातच अजित पवार हे देखील एकनाथ शिंदे यांच्या प्रमाणे राष्ट्रवादीमधून बाहेर पडले आणि त्यांनी पक्षावर दावा सांगितला. स्वाभाविकच विधान मंडळाचे गटनेतेपद असल्याने पक्ष त्यांच्याकडे गेला. अजित पवार हे शिवसेना-भाजपा युतीमध्ये सहभागी झाले. ते उपमुख्यमंत्री बनले. ही त्रिकोणी सत्ता सुरू झाल्यानंतर पुण्याच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये चढाओढ सुरू झाली होती. अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्रीपद मिळावे याकरिता आग्रही मागणी सुरू केली होती. त्यानंतर, त्यांच्या नाराजीच्या चर्चा देखील सुरू झाल्या होत्या.
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते, मात्र अजित पवार उपमुख्यमंत्री असल्याने त्यांचा प्रशासनावर अधिक वरचष्मा असल्याचे दिसत होते. पुणे जिल्ह्यातील कसलेले राजकारणी असलेले अजित पवार पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्हयावर पकड ठेवून होते. त्यामुळे पाटील आणि पवार यांच्यामध्ये अधिकारांवरून सुप्त संघर्ष सुरू झाला होता. याच राजकीय शीतयुद्धामधून पालकमंत्रीपदाची स्पर्धा सुरू झाली. त्यातच अनेकदा पुण्याचे पालकमंत्री बदलणार अशा चर्चा झडू लागल्या होत्या. कालांतराने अनेक राजकीय घडामोडी पडद्याआड घडल्या. चंद्रकांत पाटील यांना सोलापूरचे पालकमंत्रीपद देण्यात आले आणि पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार विराजमान झाले.
पुणे जिल्ह्याचे राजकारण सहकाराशी संबंधित असल्याने राष्ट्रवादी त्याकरिता नेहमीच आग्रही राहिलेली आहे. यासोबतच जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) माध्यमातून मिळणारा निधी मिळवण्याची धडपड, जिल्हयावरची पकड आणि प्रशासकीय वचक याकरिता आवश्यक असलेले पालकमंत्रीपद अजित पवार यांनी पदरात पाडून घेतले होते. महाविकास आघाडीचे सरकार असताना पवार यांनी जिल्ह्याला झुकते माप देत अधिकाधिक निधी दिला होता. मात्र, सत्तांतर झाल्यावर पालकमंत्री बनलेल्या पाटील यांनी ‘डीपीसी’तील अनेक कामांना कात्री लावली होती. एकमेकांच्या पक्षांना फायदा होईल अशा प्रकारे निधी घेण्यासाठी नेत्यांमध्ये देखील स्पर्धा होती.
आता तीच स्पर्धा पुन्हा एकदा पहायला मिळते आहे. ऐतिहासिक बहुमत घेऊन सत्तेत आलेल्या महायुतीमध्ये अद्याप मंत्रीपदाची रस्सीखेच सुरू आहे. गृह विभाग, नगर नियोजन विभागासह विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची ओढाताण सुरूच आहे. त्याकरिता देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सातत्याने बैठका देखील सुरू आहेत. दरम्यान, समाज माध्यमात संभाव्य मंत्रीमंडळाची एक यादी फिरू लागली आहे. यामध्ये बड्या दिग्गजांची नावे नसल्याचे दिसते आहे. पुण्यामधून चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, अण्णा बनसोडे, महेश लांडगे आदी नेत्यांची नावे भाजपामध्ये मंत्रीपदासाठी चर्चिली जात आहेत. तर, राष्ट्रवादीकडूनही मंत्रीपदांसाठी चाचपणी सुरू आहे. या वाटाघाटीत अजित पवारांचे ‘होम ग्राऊंड’ असलेला पुणे जिल्हा पालकमंत्री म्हणून राखण्यात ते यशस्वी होतात की भाजपाचे चंद्रकांत पाटील पालकमंत्रीपद पुन्हा खेचून आणतात हे येत्या १४ तारखेला समजू शकणार आहे.