
पोलीस आयुक्तांचे आदेश : आस्थापनांना शिस्त लावण्यासाठी तसेच समस्येवर दिर्घकालीन उपाययोजनांसाठी निर्देश
पुणे : कल्याणीनगर, कोरेगांव पार्क व मुंढवा परिसरामधील बार-रेस्टोरंट आणि पबमध्ये चालणारा धिंगाणा बंद करण्यासाठी तसेच या आस्थापनांना शिस्त लावण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निर्देश दिले असून एक समिती देखील गठीत केली आहे. या भागातील रेस्टॉरंट व एफएल ३ आस्थापनांकडून वारंवार नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या परिसरातील आस्थापनांना शिस्त लावण्यासाठी व या समस्येवर दिर्घकालीन शाश्वत उपाय योजनांसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
कल्याणीनगर, कोरेगांव पार्क व मुंढवा परिसरातील आस्थापनांना शिस्त लावण्यासाठी परिमंडळ चार व वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. परिमंडळ चारचे उपायुक्त हे समितीचे अध्यक्ष असतील. तर वाहतूक शाखेचे उपायुक्त उपाध्यक्ष, येरवडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सदस्य सचिव असतील. तर, पुणे महापालिकेचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांचे प्रतिनिधी, संबंधित नागरी वसाहतीमधील प्रमुख नागरीक हे सदस्य असणार आहेत. परिमंडळ चारच्या उपायुक्तांनी परिमंडळ पाच व दोनमधील आस्थापनांबाबत संबंधित परिमंडळांच्या उपायुक्तांशी समन्वय ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कल्याणीनगर, कोरेगांव पार्क व मुंढवा परिसरातील आस्थापना या निर्धारित वेळेचे उल्लंघन करुन उशिरापर्यत सुरु ठेवल्या जात आहेत का?, यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रक/एसओपी नुसार सीसीटीव्ही संदर्भात व इतर विषयी देण्यात आलेल्या निर्देशांचे अशा आस्थापनांकडून पालन केले जात आहे का?, अशा आस्थापनांच्या ठिकाणी व आजूबाजूला पुरेशी पार्किंगसाठीची जागा आहे का?, संध्याकाळी, विशेषतः आठवडयाच्या शेवटी या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे का?, रुफ टॉप किंवा परवान्यात परमिट रुम म्हणून परवानगी नसलेल्या ठिकाणी दारु विक्री केली जात आहे किंवा त्याबाबत तक्रारी येत आहेत का, रुफ टॉपवर संगीत वाजवले जात आहे का व ज्यामुळे स्थानिक रहिवाशांना त्याचा त्रास होत आहे का? यावर हि समिती लक्ष ठेवून काम करणार आहे. अशा आस्थापनांमध्ये लावण्यात येणारे संगीत हे आस्थापनेचे बाहेर ऐकू येणार नाही याबाबत खात्री करण्याच्या सूचना देखील आयुक्तांनी दिल्या आहेत. यासोबतच अशा आस्थापनांकडून इतर कोणतेही उल्लंघन होत असल्यास आस्थापनांच्या मालकांवर /व्यवस्थापकांवर कायद्याच्या कक्षेत राहून आवश्यक ती कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आल्या आहेत. कल्याणीनगर, कोरेगांव पार्क व मुंढवा मधील रहिवासी आणि अशा आस्थापनांच्या आसपास राहणा-या लोकांना या प्रक्रियेदरम्यान विश्वासात घेण्यात यावे. या समितीने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पोलीस आयुक्तांना १५ दिवसात सादर करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
तसेच, महापालिका आयुक्तांना त्याची प्रत देण्यात आली असून या समितीवर योग्य अधिकारी नियुक्त करण्यासंदर्भात कळवण्यात आले आहे. तसेच, इमारत आराखडयात उल्लंघन आढळून येत आहे का ते तपासले जावे. तसे आढळून आल्यास, अशा अनधिकृत बांधकामांना पाडण्यासाठी कडक मोहिम राबविण्यासाठी योग्य अधिकारी नियुक्त करावा. वापरात बदल झाल्यास, पार्किंगच्या जागेचा इतर कारणांसाठी वापर इत्यादीबाबत एमआरटीपी कायद्याअंतर्गत कारवाईसाठी आणि त्यानंतर कायदेशीर कारवाईसाठी तसेच व्यावसायिक वापरासाठी निवासी इमारती/जागेत वापरात बदल करण्याची परवानगी कायदयाच्या तरतुदींमध्ये आहे का हे तपासण्यासाठी एमआरटीपी कायद्याअंतर्गत पोलीसांकडे तक्रार दाखल करता येईल, असे नमूद करण्यात आले आहे.
तर, जिल्हाधिकारी यांना दिलेल्या प्रतीमध्ये योग्य अधिकारी समितीवर नियुक्त करावा. उत्पादन शुल्क विभागास देखील या समितीमध्ये सहभागी करुन घ्यावे. अशा आस्थापनाकडून झालेल्या उल्लंघनांबाबत त्याचे परवान्यांचे निलंबन / रद्द करणे यासह प्रशासकीय कारवाईद्वारे योग्य प्रतिसाद मिळाला आहे का याचा आढावा घेता येईल, असे नमूद करण्यात आले आहे.



