
लोणी काळभोरमधील एमआयटी कॉलेजसमोरील घटना
पुणे : दुचाकीवरून जाताना दुचाकीस्वार तरुणांनी कट मारल्यानंतर गाडी नीट चालवा म्हटल्याच्या रागातून महाविद्यालयीन तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास लोणी काळभोर येथील एमआयटी कॉलेज समोरील गार्डन जवळ घडली. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी प्रसाद प्रमोद गादीया (वय २२, रा. भोसले चाळ, अंबरनाथ मंदीरजवळ, लोणीकाळभोर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रसाद आणि त्यांचा मित्र पार्थ जयराम धमेलीया हे दोघे एमआयटी कॉलेज समोरुन त्यांच्या दुचाकीवरून जात होते. त्यांना समोरुन जाणा-या एका दुचाकी गाडीवरुन जाणाऱ्या तरुणाने कट मारला. त्यावेळी पार्थ याने ‘गाडी जरा हळू चालव’ असे म्हटले. या कारणावरून चिडलेल्या तरुणाने त्यांच्याशी वाद घालून भांडणे करण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादी प्रसाद भांडण सोडवण्याचा प्रयत्न करु लागले.
त्यावेळी आणखी चार तरुण त्याठिकाणी आले. त्यांनी फिर्यादीचा मित्र पार्थ यास सोडून दिले. मात्र, फिर्यादीला कट मारण्यावरुन झालेल्या भांडणात ‘तू मध्ये का आला?’ असे म्हणत शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली. एका आरोपीने त्यांच्या तोंडावर हाताने तसेच अन्य आरोपींनी लाकडी दांडक्याने व लोखंडी सेल्फी स्टीकने तोंडावर, हातावर व पायावर मारहाण केली.







