
पुणे : हडपसरमधील मगरपट्टा परिसरातील कल्ट हॉटेलमध्ये होळी पार्टीदरम्यान झालेल्या राड्या प्रकरणी हडपसर पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. एका प्रकरणात महिलांना मारहाण व विनयभंग केल्याचा आरोप असून दुसऱ्या प्रकरणात घटनास्थळी गेलेल्या पोलिसांना अरेरावी करून शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी २६ वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओमकार मिरजे, सुनिता लोंढे तसेच दोन बाऊन्सर आणि अन्य एक व्यक्ती यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ११५(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मार्च रोजी पहाटे तीनच्या सुमारास फिर्यादी आणि तिची बहीण होळी पार्टीसाठी कल्ट हॉटेलमध्ये गेल्या होत्या. त्या डान्स करत असताना दुसऱ्या गटातील एका तरुणाने फिर्यादीचा विनयभंग केला. त्याबाबत जाब विचारल्यानंतर आरोपींनी कोणतीही दखल न घेता फिर्यादी व तिच्या बहिणीला मारहाण करण्यास सुरुवात केली.
तक्रारीनुसार आरोपींनी फिर्यादीला जमिनीवर पाडून तिच्या तोंडावर, पोटावर व पाठीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत तिच्या उजव्या डोळ्याला दुखापत झाली.
पोलिसांना अरेरावी; दोन महिलांवर दुसरा गुन्हा
दरम्यान, या घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांशी अरेरावी करत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदार माधुरी मनोहर डोके (वय ३४) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नम्रता गणेश लांडे (वय ३६) आणि निकिता गणेश लांडे (रा. कोंढवा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२१ (१), १३२, ३५२, ३५१ (३) व ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस पथक घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असताना आरोपी महिलांनी पोलिसांशी अरेरावी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद साने करीत आहेत.






