
पिंपरी चिंचवड : पिंपरी मार्केटमधील गजबजलेल्या भागात शुक्रवारी भरदिवसा एका तरुण व्यापाऱ्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी लुटण्यात आली. या घटनेने पिंपरी चिंचवड शहरात भीतीचं आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, भावेश कंकरानी (वय २०) असे जखमी व्यापाऱ्याचे नाव आहे. तो आपल्या दुकानासमोर उभा असताना दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी येऊन त्याच्यावर गोळी झाडली. गोळी त्याच्या पायाला लागून तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर पिंपरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गोळी झाडल्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढून पळ काढला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. गुन्हेगार कोण आणि हल्ल्यामागे उद्देश काय, याचा तपास सुरु आहे. हा हल्ला केवळ चोरीसाठी होता की वैयक्तिक वादातून झाला, हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
भर बाजारपेठेत असा थरार माजवणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी स्थानिक व्यापाऱ्यांसह नागरिकांनी केली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून तपास सुरू असून आरोपी लवकरच गजाआड जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.




