
मुख्य चौकामध्ये केले जाणार ‘सेगमेंटल लॉचिंग’चे काम
#पुणे : कात्रज येथील उड्डाणपुलाचे काम पुढे सरकत असून मुख्य चौकामध्ये ‘सेगमेंटल लॉचिंग’चे काम केले जाणार आहे. त्याकरिता कात्रज चौकामध्ये होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूकीमध्ये बदल केले जाणार आहेत. हे बदल ३ डिसेंबर ते पुढील आदेशा होईपर्यंत लागू राहणार आहेत. तात्पुरत्या स्वरूपात प्रायोगीक तत्वावर केले जाणारे बदल काम पूर्ण झाल्यानंतर पूर्ववत करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
डंपर, हायवा, मिक्सर, हेवी मोटर व्दईकल्स, हेवी गुड़्स मोटार व्दईकल्स, हेवीट्रान्सपोर्ट व्हईकल, ट्रेलर्स, कंटेनर्स, मल्टी अॅक्सल वाहने अशा जड व अवजड जड आणि अवजड वाहनांसाठी साताऱ्याकडून येताना जुना कात्रज बोगद्यामार्गे येण्यास मनाई करण्यात आली आहे. शिंदेवाडी पुलाजवळ ही प्रवेश बंदी केली जाणार आहे. ही वाहने नविन बोगदामार्गे नेली जावीत. तसेच या वाहनांना नवले पुलाकडून कात्रज चौकाकडे येण्यास मनाई करण्यात आली आहे. मुंबईकडून वारजे मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना नवले पुल येथून पुढे प्रवेश बंद राहील. सोलापुरकडून हडपसर-मंतरवाडी मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना मंतरवाडी चौकाच्या पुढे प्रवेश बंद राहील. तसेच, सासवडकडून मंतरवाडी मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना मंतरवाडी चौकाच्या पुढे प्रवेश बंद राहील.
बोपदेव घाटाकडून कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना खडी मशिन चौकाच्या पुढे प्रवेश बंद राहील. तसेच, मार्केट यार्ड, गंगाधाम-बिबवेवाडी मार्गे कात्रज चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना इस्कॉन मंदिर चौकाच्या पुढे प्रवेश बंद राहणार आहे. स्वारगेटकडून कात्रज मार्गे साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. मंतरवाडी, उंड्र, पिसोळी भागातील स्थानिक जड वाहनांना रात्री दहा ते पहाटे चार वाजेदरम्यान प्रवेश सुरू राहणार आहे. परंतु, या वाहनांना इस्कॉन मंदिर चौकाचे पुढे कात्रज चौकाकडे प्रवेश दिला जाणार नाही.
यासोबतच एसटी बसेस आणि ट्रॅव्हल्स, प्रवासी वाहतुकीसाठी देखील आदेश देण्यात आले आहेत. मुंबईकडून वारजे मार्गें कात्रज चौकाकडे येणाऱ्या एसटी बसेस व ट्रॅव्हल्स वाहनांना नवले पुल येथे प्रवेश बंद राहील. साताऱ्याकडून स्वारगेटकडे येणाऱ्या एसटी बसेस व ट्रॅव्हल्स वाहनांनी नवले पुलाखालून उजवीकडे वळण घेऊन कात्रजमार्गे स्वारगेटकडे जावे. सिंहगड रस्त्यावरील एसटी बसेस व ट्रॅव्हल्स वाहनांमुळे होणारी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा. तसेच, मांगडेवाडी, दत्तवाडी, हांडेवाडी व कात्रज परिसरातील नागरिकांनी स्वारगेटकडे जाण्यासाठी शक्यतो कात्रज चौका कडे न जाता इतर उपलब्ध पर्यायी मार्गांचा अधिकाधिक वापर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.