
येरवडा भागातील घटना : हल्लेखोराला ठोकल्या बेड्या
पुणे : आर्थिक वादामधून एका तरुणीचा धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची घटना विमाननगर येथील ‘डब्ल्यूएन’ कंपनीच्या पार्किंगमध्ये मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली. तरुणी एका कॉल सेंटरमध्ये काम करीत होती. हात उसण्या घेतलेल्या पैशांच्या कारणावरून हा खून करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. येरवडा पोलिसांनी तात्काळ हालचाल करीत आरोपीला रात्री अटक केली.
शुभदा शंकर कोदारे (वय २८, रा. बालाजीनगर, धनकवडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय २८, रा. खैरेवाडी, शिवाजीनगर) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी साधना शंकर कोदारे (वय २६, रा. काळेवाडी, पिंपरी-चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेली तरुणी मूळची सातारा जिल्ह्यातील राहणारी आहे. ती विमाननगरमध्ये असलेल्या ‘डब्ल्यूएन’ कॉल सेंटरमध्ये काम करीत होती. आरोपी देखील या कॉल सेंटरमध्ये काम करतो. मंगळवारी संध्याकाळी शुभदा ही ड्युटीवर जाण्यासाठी निघाली होती. ती आणि तिची मैत्रीण हिच्यासह ‘डब्ल्यूएन’च्या पार्किंगमध्ये उभी होती. त्यावेळी आरोपी कृष्णा त्या ठिकाणी आला. त्याने शुभदा सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. हात उसणे दिलेल्या पैशांवरून हा वाद सुरू होते.
काही कळायच्या आतच त्याने धारदार हत्याराने तिच्यावर चार ते पाच वार केले. हे सर्व वार तिच्या उजव्या हातावर बसले. पिडीत मुलगी आणि तिच्या मैत्रीणीने आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर कंपनीतील कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांनी मदतीसाठी धाव घेतली. गंभीर जखमी झाल्याने तिला तात्काळ सह्याद्री रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांना या घटनेची माहिती कळविण्यात आली. येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले. रुग्णालयात उपचार सुरू असताना शुभदाचा मृत्यू झाला. अति रक्तस्त्रावामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
काय आहे खुनामागील कारण?
वडिलांना हाय शुगर आहे, त्यांच्या ऑपरेशनसाठी, ट्रिटमेंटसाठी पैसे लागत असल्याचे सांगून तिने कधी २५ हजार तर कधी ५० हजार रुपये असे कृष्णा सत्यनारायण कनोजा याच्याकडून तब्बल ४ लाख रुपये घेतले होते. तिची मागणी थांबत नव्हती, त्यामुळे कृष्णाला संशय येऊ लागला. शेवटी काही दिवसांपूर्वी तो कराड गेला. तिच्या वडिलांना भेटला. तेव्हा त्यांनी आपली कसली शस्त्रक्रिया झाली नाही की शुगरच्या उपचारासाठी इतके पैसे मी तिच्याकडे मागितले नाही, असे वडिलांनी सांगितले. आपल्याला वडिलांच्या आजारपणाचे कारण सांगून विश्वासघात केल्याची भावना कृष्णाच्या मनात निर्माण झाली. त्यातूनच तो तिला उसने घेतलेले पैसे परत मागत होता. तेव्हा झालेल्या वादावादीत विश्वासघाताच्या दु:खातून त्याने कोयत्याने तिच्या हातावर जोरात घाव घातला. त्यात तिच्या हाताच्या नसा तुटल्या. ती लो शुगरची रुग्ण असल्याने तिचे रक्त गोठले जाण्याची प्रक्रिया न झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. त्यातच तिचा मृत्यु झाला.
काॅल सेंटरमधील तरुणीवर झालेला हल्ला आर्थिक वादातून झाल्याची माहिती प्राथमिक चौकशीत मिळाली आहे. आरोपीने कोयता लपवून आणला होता. त्याने कोयता कोणाकडून आणला, याची चौकशी सुरू आहे. तरुणीचा आरडाओरडा ऐकून सुरक्षारक्षकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
– मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त