
मूळचा उत्तरप्रदेशचा तरुण वसतिगृहातील खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत
पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
अंतरिक्ष कुमार असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील लखनऊ जिल्ह्यातील रहिवासी आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंतरिक्ष हा जुलै महिन्यात एनडीएमध्ये दाखल झाला होता. सध्या पहिल्या सत्रात शिक्षण घेत होता. पहाटेच्या सुमारास त्याने वसतिगृहातील खोलीत बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी पोलिसांना कळवले आणि उत्तमनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. घटनास्थळावर कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अंतरिक्षच्या निधनाने प्रबोधिनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे, या घटनेनंतर त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.