
पुणे : जैन साधकाच्या वेषात येऊन मंदिरातील मौल्यवान ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. ही घटना १५ नोव्हेंबर रोजी घडली होती.
नरेश आगरचंद जैन (रा. बॉम्बे चाळ, गिरगाव, व्ही. पी. रोड, मुंबई) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी जय परेश पारेख (रा. सिटीवुड सोसायटी, पुनावाला गार्डनसमोर) यांनी फिर्याद दिली होती. जैन यांच्या घरातील जैन मंदिरातील देवाचे सोन्याचे मुकुट व सोन्याची चैन चोरण्यात आली होती. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेच्या दिवशीच स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये व शहरातील ४ जैन मंदिरांमधील देवाचे दागिने चोरीचा प्रयत्न झाला होता. या दिवशी कार्तिक पोर्णिमेनिमित्ताने जैन मंदीरांमध्ये समारंभपूर्वक पूजाअर्चा करून समारंभ साजरा केला जातो.
त्याच दिवशी या चोऱ्या झाल्याने, लोकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरिक्षक युवराज नांद्रे यांनी तत्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शानाखाली विशेष तपास पथक नेमले. तांत्रिक विश्लेषन करून, सीसीटीव्ही फुटेज पाहून, तसेच पुणे ते मुंबई पर्यंत पोलिसांनी खबऱ्यांकडून माहिती काढण्यास सुरुवात केली. दरम्यान, पोलीस हवालदार सागर केकाण यांना खबऱ्याने अशाच प्रकारचे गुन्हे मुंबई, डोंबिवली व इतर परिसरात घडले असून यामधील आरोपी सध्या मुंबईतील गिरगाव भागात राहण्यास असल्याची माहिती दिली.
पोलिसांनी ताबोडतोब मुंबईच्या गिरगावमध्ये जाऊन संशयीत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी चोरीला गेलेले देवाचे सोन्याचे मुकुट व सोनसाखळी असा ४ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपी सराईत चोरटा असून अनेक पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्याने यापूर्वी घाटकोपर, वाई, चिखली, डोंबिवली इत्यादी भागात ८ ते १० ठिकाणी अशाच पध्दतीने मंदीरांमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल केलेले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, पोलीस उप-निरिक्षक तानवडे, पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे, शंकर संपते, सागर केकाण, रफिक नदाफ, श्रीधर पाटील, कुंदन शिंदे, सतीश कुंभार व पोलीस मित्र दिनेश परिहार यांनी केली.