
बंडू आंदेकर नंतर टिपू पठाण याचा लागला नंबर
पुणे : पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांप्रमाणे कुख्यात गुन्हेगारांच्या अनधिकृत मालमत्तेवर बुलडोझर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. नाना पेठ, गणेश पेठेत दबदबा असलेल्या बंडू आंदेकर टोळीनंतर आता पोलिसांनी टिपू पठाण याचे सय्यदनगर येथील अनधिकृत कार्यालय जमीनदोस्त केले.
कुख्यात गुंड रिझवान ऊर्फ टिपू पठाण याने सय्यदनगर भागात बेकायदा बांधकाम करुन कार्यालय, टपरी व इतर अनाधिकृत अतिक्रमण केले होते. काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील व त्यांच्या सहकार्यांनी शुक्रवारी मोठ्या बंदोबस्तात जेसीबीसह सय्यदनगर येथील ख्वाजा मंजील इमारतीवर कारवाई केली. महापालिकेचा अतिक्रमण विभागाने या सर्व बेकादेशीर बांधकामावर कारवाई करुन ते जमीनदोस्त केले.
टिपू सत्तार पठाण हा सराईत गुन्हेगार असून काळेपडळ, हडपसर परिसरात त्याची दहशत आहे. एका महिलेची जमीन हडप करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल टिपू पठाण, त्याचा भाऊ व त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक अमर काळंगे व काळेपडळ पोलीस ठाण्यातील अधिकारी, पोलीस अंमलदार, पुणे महापालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने करण्यात आली.



