
बांधकाम व्यावसायिकाची २३ लाखांची फसवणूक
बजाज फायनान्समधील अधिकार्यांनी परस्पर हस्तांतरण करुन दिला मिळकतीचा ताबा
पुणे : कोंढवा येथील मिळकतीची रक्कम येणे बाकी असतानाही बजाज फायनान्स कंपनीतील अधिकार्यांनी परस्पर संगनमत करुन ना हरकत पत्र न घेताच परस्पर बेकायदेशीरपणे हस्तांतरण करुन मिळकतीचा ताबा देऊन बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत जितेंद्र अरविंद पाठक (वय ५४, रा. मधुरा अपार्टमेंट, प्रभात रोड, डेक्कन) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी बजाज फायनान्सचे संबंधित अधिकारी आणि धन्यकुमार अंबरचंद गुगळे (रा. कृष्णकुंज बंगला, कोंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोंढव्यातील कुंजकृंज बंगला येथे ३० ऑगस्ट २०२८ ते आतापर्यत घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जितेंद्र पाठक हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची कोंढवा येथील कृष्णकृंज बंगला येथील युनिट क्रमांक २ ही मिळकत आहे. त्यांनी ही मिळकत एकाला दिली होती. त्यांच्याकडून पाठक यांना २३ लाख २५ हजार रुपये येणे बाकी होते. या पार्टीने बजाज फायनान्स यांच्याकडून कर्ज घेतले होते. त्याची परतफेड त्या पार्टीने केली नाही. तसेच पाठक यांनाही २३ लाख २५ हजार रुपये या पार्टीकडून येणे बाकी होते. हे बजाज फायनान्स कंपनीतील अधिकार्यांना माहिती होते. धन्यकुमार गुगळे यांनी या मिळकतीवर असलेल्या कर्जाची रक्कम बजाज फायनान्समध्ये जमा केली. पाठक यांचे या मिळकतीवर येणे बाकी आहे, हे माहिती असताना बजाज फायनान्स कंपनीतील अधिकार्यांनी जितेंद्र पाठक यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे ना हरकत प्रमाणपत्र न घेता पाठक यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने शासनास हे हस्तांतर कायदेशीर असल्याचे भासवुन बेकायदेशीरपणे हस्तांतरण धन्यकुमार गुगळे यांना करुन त्या मिळकतीचा ताबा दिला. सहायक पोलीस निरीक्षक अमित कुंभार तपास करीत आहेत.