
वानवडी येथील घटनेमुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर
पुणे : शहरात पुन्हा एकदा अवजड वाहनांची दिवसाढवळ्या राजरोस वाहतूक सुरु झाली आहे. वाहतूक पोलिसांच्या नजरेखालून ट्रक, मिक्सर, कंटेनर्स आदी जड-अवजड वाहने शहरात यमदूत बनून फिरत आहेत. अशाच एका जड वाहनामुळे एका महिलेला आपला पाय गमवावा लागला. भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे महिलेचा पायच धडापासून वेगळा होऊन तुटला. हा अपघात वानवडी येथील मंम्मा देवी चौकात २३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे.
रुपाली प्रविण जैन (वय ५०, रा. फ्लॅव्हर व्हॅली, जस्मिन बिल्डींग, वानवडी) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ट्रक चालक मंगेश सयाजी जमदाडे (वय २७, रा. होले वस्ती, चिंचोळी, ता. दौंड) याच्यावर भारतीय न्याय संहिता २८१, १२५ (ब), ३२४ (२) मोटार वाहन कायदा १८४, ११९/१७७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी या जगताप चौक येथील एका हेअर सलूनमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, २३ नोव्हेंबर रोजी फिर्यादी त्यांच्या दुचाकीवरून (एमएच १२, ईयु २२८६) जात होत्या. हा ट्रक (एमएच १२, वायबी ९५१५) हडपसरच्या दिशेने निघालेला होता. आरोपी चालक जमदाडे याने हा भरधाव ट्रक वाहतुकीचे नियमाकडे दुर्लक्ष करुन हयगयीने चालवला. फिर्यादीच्या दुचाकीला डाव्या बाजूने धडक दिली. या अपघातात फिर्यादीचा डावा पाय शरीरापासून तुटून बाजूला झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुपाली यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ट्रक चालकाला पोलिसांनी नोटीस दिली असून याप्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार आर. आय. शेख करीत आहेत.
#PuneNews, #WanwadiAccident, #HeavyVehicleTraffic, #PuneTrafficUpdate, #RoadSafetyIndia, #PuneBreaking, #MaharashtraNews, #TrafficPolicePune, #AccidentAlert, #PuneCity







