
अंगणात खेळत असतानाच घडली दुर्घटना
#पुणे : अंगणात बांधलेल्या बैलांची दोरी हातात घेऊन तिच्याशी खेळत असतानाच बैल अचानक पळत सुटले. या दोरीशी खेळत असलेला आठ वर्षीय मुलगा बैलांसोबत फरफटत गेला. त्यामुळे गंभीर झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना हवेली तालुक्यातील फुलगाव येथे सोमवारी संध्याकाळी घडली. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर आघात झाला आहे.
शौर्य शैलेश वागस्कर (वय ०८, रा. फुलगाव, ता. फुलगाव) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. तो फुलगाव येथील शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिकत होता. तो एकुलता एक होता. लोणीकंद पोलिसांनी आकस्मित मृत्यू अशी नोंद केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शौर्य अंगणात खेळत होता. त्यांच्या घराच्या अंगणात बैल बांधलेले होते. त्याने बैल बांधलेली दोरी सोडली आणि ती हातात घेतली. ही दोरी मोठी होती. त्यावेळी बैल अचानक पळत सुटले. या दोरीचा त्याच्या गळयाभोवती व अंगाभोवती फास बसला. बैल पुढे पळत असल्याने ही दोरी ओढली गेली.
त्यासोबत फरफटत गेल्याने शौर्यला जबर मार लागला. यात गंभीर जखमी झाला. त्याने जोरजोरात आरडाओरडा सुरू केला. त्याचा आवज ऐकून त्याचे आईवडील बाहेर पळत आले. त्यांना शौर्य गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.