
रुग्णालयाच्या सुरक्षा कर्मचाऱ्याला पोलिसांकडून ठोकण्यात आल्या बेड्या
पुणे : ससुन रुग्णालयाचे डॉक्टर आणि वैद्यकीय अधीक्षकांच्या मोबाईलवर मेसेज करून रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे, रुग्णालयात अॅडमिट असलेल्या एका महिला रुग्णाचा मोबाईल चोरून त्यावरून मेसेज पाठवून त्याने बॉम्बची अफवा पसरवल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या अफवेमुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अरविंद कृष्णा कोकणी (वय २९, रा. नागपुर चाळ, येरवडा) असे ताब्यात घेण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी डॉ. हरिष सुरेश टाटीया यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ मे रोजी ससुन रुग्णालयाचे डॉक्टरांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने मेसेज करून रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याच्या आशयाचा मेसेज केला. त्यानंतर बंडगार्डन पोलिसांच्या पथकाने आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाचा परिसर पिंजून काढला. बॉम्बच्या अफवेमुळे रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना वेठीस धरणे तसेच रुग्णालयाच्या परिसरात बॉम्ब असल्याची धमकी देऊन परिसरात भितीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांच्या तपास पथकाने रुग्णालयाच्या परिसरात कसून तपास केला. तांत्रिक तपास आणि खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी अरविंद कोकणी याला ताब्यात घेतले. कोकणी हा ससुन ररुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून कामास आहे. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली. चौकशीत त्याने सांगितले की, रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ७३ मध्ये अॅडमिट असलेल्या एका महिला रुग्णाचा मोबाईल चोरला. त्यानंतर त्याने डॉ. हरिष टाटीया यांच्या मोबाईलवर मेसेज करून रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने मोबाईल बंद करून ठेवला. दुसऱ्या दिवशी त्याने मोबाईल सुरू करून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक जाधव यांना बॉम्बच्या धमकीचा मेसेज केला. त्यानंतर त्याने पुन्हा मोबाईल बंद करून ठेवल्याची कबुली दिली. दरम्यान, पोलिसांनी कोकणी याला अटक केली आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक आयुक्त दिपक निकम, वरिष्ठ निरीक्षक रविंद्र गायकवाड, गुन्हे शाखेचे निरीक्षक निळकंठ जगताप, संपतराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, अंमलदार प्रदिप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, मनोज भोकरे, मनिष संकपाळ, महेश जाधव, विष्णु सरवदे, अमित सस्ते, रामदास घावटे, तुषार आल्हाट यांच्या पथकाने ही कामगिरी केली.