
पुणे : राजगड तालुक्यातील रांजणे फाटा येथे भेकर (पिसोरी) या वन्यप्राण्याची शिकार केल्याप्रकरणी वन विभागाने मोठी कारवाई करत तीन जणांना अटक केली आहे. आरोपींकडून वन्यप्राण्याचे मांस आणि शिकार करण्यासाठी वापरलेली हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. न्यायालयाने आरोपींना २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे यांनी दिली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये मारुती बबन दारवटकर (रा. कोंडगाव), दत्तात्रय लक्ष्मण नलावडे आणि गोरख हनुमंत नलावडे (दोघे रा. निगडे मोसे) यांचा समावेश आहे. गुप्त माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने सापळा रचून रांजणे फाटा येथे आरोपींना पकडले. ते रिक्षा (क्र. MH-12-VW-6394) मधून शिकारीसाठी आले होते. कारवाईदरम्यान त्यांच्या ताब्यातून भेकराचे मांस जप्त करण्यात आले.
या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील कलम २(१), ९, ४८(अ), ३९, ५०, ५१ तसेच भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यासाठी कमाल ७ वर्षांपर्यंत कारावास आणि २५ हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असून हा गुन्हा अजामीनपात्र आहे.
सदर कारवाई वनपाल एस. डी. अर्जुन, वनरक्षक आर. आर. निंभोरे, व्ही. एस. निकम, ए. आर. सोनकांबळे आणि एन. पी. रासकर यांच्या पथकाने केली. दरम्यान, डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत राजगड तालुक्यात वन्यप्राणी शिकार प्रकरणी १४ जणांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.





