
पुणे : भाजपचे आणि विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करुन खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.९) रोजी घडली. त्यांचा मृतदेह सोलापूर रस्त्यावरील यवत गावाच्या हद्दीत आढळून आला.
सतीश वाघ असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वाघ हे सोमवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. ते सकाळी सोलापूर रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल ब्लू बेरीसमोर थांबले होते. तिथे अचानक एक चारचाकी गाडी येऊन थांबली. त्या गाडीतून उतरलेल्या दोघांनी सतीश वाघ यांनी जबरदस्तीने गाडीत बसवले. सतीश वाघ यांचे चौघांनी अपहरण केल्याचे समोर आले. यानंतर त्यांच्या मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. भाजपच्या एका विद्यमान आमदाराच्या मामाचे अपहरण झाल्याने पुणे शहरात खळबळ उडाली होती.
पोलिसांनी या प्रकरणाची दखल शोध पथकांची नेमणूक केली होती. त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली होती. सोलापूर रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तीन फुटेजमध्ये त्यांना घेवून जाणारी गाडी सोलापूर मार्गाकडे जात असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात होता. संध्याकाळी सव्वा सात वाजता पाटस गावाच्या हद्दीत त्यांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांनी समजली. पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली.
दरम्यान, मुलाने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. सतीश वाघ यांचे अपहरण करून त्यांना सोलापूरच्या दिशेने नेल्याची माहिती सतीश वाघ यांच्या मुलाने दिली होती. वाघ यांचा खून हा जमिनीच्या वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.







