
खडक पोलिसांची धडक कारवाई : भांगेचे गोळे तयार करण्यासाठी लागणारी मशीन, वजनकाटे यासंह गांजा जप्त
लक्ष्मण मोरे
पुणे : पुण्याच्या मध्यवस्तीत असलेल्या गंज पेठेमध्ये चक्क गांजापासून भांग तयार करण्याचा कारखाना चालवला जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. खडक (Khadak Police Station) पोलिसांनी याठिकाणी छापा टाकत तब्बल ३५१ किलो पावडर, २८० भांगेचे गोळे, भांग तयार करण्यासाठी वापरलेली मशीन, वजनकाटे, फ्रिज, शेगडी, पातेले आदी साहित्य आणि रोकड जप्त केली. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत सव्वा लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून हा कारखाना चालविणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहिनी सुरेश चव्हाण (वय ५२, रा. त्रिशुल मित्र मंडळाजवळ, ४७८ गंजपेठ) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई आशीष चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई आशीष चव्हाण यांना त्यांच्या खबऱ्याने गंजपेठेमध्ये एक महिला भांगेच्या गोळ्यांची विक्री करीत असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार, त्यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस उप-निरीक्षक महेंद्र कांबळे, पोलीस शिपाई नदाफ आणि आशीष चव्हाण ही तिघेही सील साहित्य, लेखन साहित्य, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, ड्रग्ज डिटेक्शन किट, टॉर्च सर्च लाईट, लॅपटॉप, प्रिंटर इत्यादी घेऊन गंजपेठ येथे सापळा लावला. त्यांनी मीठगंज पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अनिता तोंडे, तपास पथकाचे सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे आदींची मदत घेतली.
या भागात त्रिशुल मित्रमंडळाच्या पाठीमागे असलेल्या हिंदु खाटीक समाज ट्रस्ट चौकात रोहिणी चव्हाण ही तिच्या घरासमोरील अंगणात जिन्याजवळ बसलेली होती. तिच्याकडे प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भांगेच्या गोळ्या होत्या. याठिकाणी अचानक छापा टाकून तिला ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडील प्लास्टीकच्या पिशवीमध्ये भांगेचे गोळे असल्याची कबुली दिली. तिच्या घराच्या अंगणातील जिन्या जवळ आणखी भांगेचे गोळे तिने लपवलेले होते. याठिकाणावरून एकूण २८ हजार रुपयांचे २४ किलो वजनाचे २८० गोळे जप्त करण्यात आले. यासोबतच ४४० रुपयांची रोकड तिच्याकडे मिळून आली.
हे भांगेचे गोळे विक्रीसाठी कुठून आणले याची चौकशी केली असतय तिने आपल्याकडे कोणताही अधिकृत परवाना नसून घराच्याबाजुला असलेल्या एका खोलीमध्ये हा माल बनवत असल्याचे सांगितले. माल पूर्णपणे तयार केल्यानंतर घरातील फ्रीजमध्ये हा माल ठेवला जात होता. या खोलीची झडती घेतली असता तिथे उग्र स्वरूपाचा वास आला. तसेच, अस्वच्छता दिसून आली. याठिकाणी भांगेचे गोळे तयार करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य आढळून आले. यामध्ये १० हजारांचा फ्रिज, लोखंडी शेगडी, अॅल्युमिनीयमचे मोठे पातेले, दोन वजनकाटे व मापे, भांगेचे गोळे तयार करण्याची मशीन, एक मोटर याचा समावेश होता. यासोबतच, ७० हजार ३३० रुपयांची सात पोती भरून भांग तयार करण्याची ३५१ किलो पावडर आढळून आली. जप्त केलेल्या भांगेचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिता तोंडे करीत आहेत.




