
स्व. भैय्याजी काणे जन्मशताब्दी सांगता
पुणे : आंतरिक जिव्हाळा आणि निखळ प्रेमाच्या बळावर भय्याजी काणे यांनी अत्यंत प्रतिकूल स्थितीत शिक्षणाचे रोपटे ईशान्य भारतात लावले. विरोधकांना न जुमानता, गरीब, स्थानिकांना कुठलीही लालसा न दाखवता आत्मीतयतेने आपलेसे करून घेतले व ईशान्येच्या भूमीत आपले पाय घट्ट रोवले. दूरदृष्टी आणि प्रभावी व्यक्तीमत्त्व लाभलेले स्व. भय्याजी काणे यांनी शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचे मोठे ईश्वरी कार्य उभे केल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुरेश तथा भय्याजी जोशी यांनी केले.
पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान आयोजित ध्येयवादी शिक्षक व संघप्रचारक शंकर दिनकर तथा स्व. भय्याजी काणे जन्मशताब्दी सांगता समारंभात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. बीएमसीसी महाविद्यालयाच्या टाटा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रसिध्द उद्योजक, क्वीकहिल टेक्नाॅलाॅजीचे संस्थापक कैलास काटकर, रा. स्व. संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वांजरवाडकर, पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रदीप कदम तसेच प्रतिष्ठानचे कार्यवाह जयवंत कोंडविलकर उपस्थित होते.

यावेळी भय्याजी जोशी म्हणाले की, धर्मभेदाच्या पलीकडे राष्ट्रीयत्वाचा एकात्म भाव जागृत केल्याशिवाय भारतीय सीमा सुरक्षित राहणार नाहीत, यादृष्टीने शिक्षण हे माध्यम निवडताना भय्याजींची दूरदृष्टी जाणवते. कारण राष्ट्रभावनेचा संस्कार खोलवर रूजविण्यासठी शालेय वय हे सर्वात योग्य असते. नवी पिढीच नवा भारत घडवणार आहे. तसेच पूर्वांचलातील आत्ताची लहान मुलेच पुढे नवा ईशान्य भारत निर्माण करतील, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. दृष्टी, संकल्पना, आग्रह, व्हीजन आणि मिशन हे सर्व पैलू भय्याजींच्या ठायी एकत्र आल्यामुळे शिक्षणातून एकात्मता हे कार्य आज यशस्वी होताना दिसत आहे. परंतु, असे असले तरी कुठल्याही कामाला पूर्णत्व यायला काही वेळ लागतो, तसा हेही कार्य संपूर्ण व्हायला आणखी काही काळ जावा लागेल, या कामाचा सध्या हा मध्यान्ह काळ म्हणावा लागेल.

आसामच्या नागरिकांना नागालँड , मिझोराम, मणिपूरी नागरिकांबद्दल आपुलकी वाटली पाहिजे, स्थानिक आदिवासी जनजातींचे आपापसातील मतभेद मिटल्याशिवाय ईशान्येचा प्रश्न सुटणार नाही, हे लक्षात घेऊन या कामाला आणखी गती द्यावी लागेल, असेही ते म्हणाले. प्रमुख पाहुणे कैलास काटकर म्हणाले, सहसा आपला गाव न सोडणारा महाराष्ट्रातला माणूस, पण भय्याजी काणेंसारखी ध्येयवादी व्यक्ती लहानग्या जयवंतला घेऊन 50 वर्षापूर्वी भारताचे थेट ईशान्य टोक गाठते, धगधगत्या मणिपूरला येते, तिथे छोट्याशा शाळेच्या माध्यमातून खूप मोठे राष्ट्रीय एकात्मतेचे कार्य घडवले, ही सर्व कहाणी अतिशय उदभूत आहे. ईशान्य भारतातील वंचित आदिवासींच्या जीवनात आलेले परिवर्तन अचंबित करणारे आहे. पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानचे कार्य अत्यंत प्रशंसनीय असून या कार्यास सर्वांनी सहयोग द्यावा असे आवाहन त्यांनी केले.
टिळक रोडवरील पूर्वांचल मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थीनींनी यावेळी स्वागत गीत गायन केले. श्रुती प्रणव मेहता यांनी प्रास्ताविक केले. मेहर परळीकर यांनी यावेळी पद्य म्हणले. सूत्रसंचालन शिरीष आपटे यांनी केले तर चेतन कुलकर्णी या॔नी आभार मानले. पिंपरी चिंचवडच्या पूर्वांचल वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी यावेळी संपूर्ण वंदे मातरम सादर केले.

यावेळी ईशान्य भारताची सद्यस्थिती व भय्याजींच्या प्रेरणेतून ऊभे राहिलेले शैक्षणिक कार्य यांचा मागोवा घेणारा लघुपट दाखवण्यात आला. बालवयापासून भय्याजींबरोबर राहून मणिपूरच्या शाळेत शिकून आजपर्यंत त्याच कार्याला वाहून घेतलेले प्रतिष्ठानचे प्रणेते व प्रमुख कार्यवाह जयवंत कोंडविलकर यांनी ईशान्य भारतातील प्रतिष्ठानच्या कार्याची भूमिका व सद्यस्थिती मांडली. जन्मशताब्दी वर्षात राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती आदिती मोगरे यांनी चित्रफितीद्वारे सादर केली. जन्म शताब्दी वर्षात भय्याजींचे जन्मस्थान असलेल्या नाशिक शहरातून उपक्रमांचा शुभारंभ होऊन पुणे , सांगलीसह मणिपूर येथे शिक्षण, मूल्यशिक्षण, विज्ञान, आरोग्य, निसर्ग यावर आधारीत विविध कार्यक्रम घेण्यात आले.





