
अत्याधुनिक सेमीकंडक्टर्सच्या देशांतर्गत उत्पादनावर भारत सरकारने दिला आहे भर
लक्ष्मण मोरे
पुणे : भारताची ऑटोमोबाईल इंडस्ट्री सध्या परिवर्तनाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहे. एकेकाळी फक्त स्कूटर, मोटारसायकल आणि मर्यादित कार ब्रँडपर्यंत सीमित असलेली ही इंडस्ट्री आता जागतिक उत्पादन केंद्र म्हणून उदयाला येत आहे. इलेक्ट्रिक वाहनांची मागणी, ग्रीन मोबिलिटीकडे होणारी वाटचाल, आणि भारत सरकारची ‘मेक इन इंडिया’ व ‘प्लग अँड ड्राईव्ह’ धोरणे यामुळे उद्योगाला नवे वळण मिळाले आहे.
भारत सध्या जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ आहे. दुचाकी, चारचाकी, व्यावसायिक वाहने आणि ट्रॅक्टर उत्पादनामध्ये भारताचा वाटा मोठा आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारतातील ऑटोमोबाईल उद्योगाची एकूण उलाढाल सुमारे १२५ अब्ज डॉलर (१०.४ लाख कोटी रुपये) इतकी असल्याचे अनुमान आहे. यापैकी ३०-३५ टक्के उत्पादन हे निर्यातीसाठी वापरले जाते.
भारतभर विविध ठिकाणी ऑटोमोबाईल हब्स तयार करण्यात आले आहेत, जेथे उत्पादन, असेंब्ली, स्पेअर पार्ट्स निर्मिती व संशोधन केंद्रे कार्यरत आहेत. चेन्नईला (तामिळनाडू) ‘डेट्रॉईट ऑफ इंडिया’ असेही म्हणतात. Hyundai, Ford, Renault-Nissan, BMW यांचे कारखाने याठिकाणी आहेत. पुण्यामध्ये (महाराष्ट्र) Mercedes-Benz, Bajaj, Tata Motors, Volkswagen यांचे उत्पादन युनिट्स आहेत. मानेसर-गुरुग्राममध्ये (हरियाणा) Maruti Suzuki, Hero Motocorp यांचे मुख्य प्लांट आहेत. तर, साणंद-हंसरपूर (गुजरात) येथे Tata Motors, Suzuki Motors यांचे नवीन प्रकल्प येथे उभारण्यात आलेले आहेत. होसूर-बंगळुरू (कर्नाटक) हा भाग दुचाकी व इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत पुढे आहे.
ऑटोमोबाईल उद्योग हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक रोजगारनिर्मिती करणारा देश आहे. या उद्योगात थेट आणि अप्रत्यक्ष मिळून सुमारे ३.७ कोटी लोक कार्यरत आहेत. यामध्ये इंजिनिअर्स, तंत्रज्ञ, असेंब्ली कामगार, विक्री व विपणन व्यावसायिक, आणि संशोधन वैज्ञानिक यांचा समावेश होतो. इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढल्याने EV इंजिनिअरिंग, बॅटरी टेक्नॉलॉजी आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या क्षेत्रात नोकरीच्या नव्या संधी उदयास येत आहेत.
भारत हा जगातील अनेक देशांना वाहने निर्यात करणारा महत्त्वाचा देश आहे. भारतीय कंपन्यांनी विशेषतः आफ्रिका, लॅटिन अमेरिका, दक्षिण आशिया आणि युरोपियन युनियनमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. सध्या भारत १७५ पेक्षा अधिक देशांना वाहन व वाहनांचे स्पेअर पार्ट निर्यात करतो. यामध्ये नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका (दक्षिण आशिया), नायजेरिया, दक्षिण आफ्रिका (अफ्रिका), ब्राझील, मेक्सिको (लॅटिन अमेरिका), यूएई, सौदी अरेबिया (GCC देश), जर्मनी, फ्रान्स, इटली (युरोप) प्रमुख निर्यातदार देश आहेत.
भारत सरकारच्या ‘ऑटोमोटिव्ह मिशन प्लान २०२६’ आणि ‘PM Gati Shakti’ योजनेमुळे भविष्यात भारत हा जागतिक ऑटो हब बनण्याच्या मार्गावर आहे. याशिवाय FAME II (Faster Adoption and Manufacturing of Hybrid and Electric Vehicles) या योजनेमुळे इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे. भारताची ऑटोमोबाईल इंडस्ट्री सध्या आधुनिकतेच्या मार्गावर आहे. मोठी बाजारपेठ, तंत्रज्ञांची उपलब्धता आणि धोरणात्मक पाठबळ यामुळे भारत हा फक्त उत्पादनातच नव्हे तर संशोधन, निर्यात व सेमीकंडक्टर उत्पादनातही जागतिक आघाडीवर पोहोचण्याच्या मार्गावर आहे.
सेमीकंडक्टर उत्पादनाचे नियोजन
वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक सेमीकंडक्टर्सच्या टंचाईमुळे भारत सरकारने देशांतर्गत उत्पादनावर भर दिला आहे. डोळेरा (गुजरात) येथील भारतातील पहिला सेमीकंडक्टर फॅब प्रकल्प, पुण्यातील यवतमध्ये टाटा समूहामार्फत मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. तर, होसूर आणि बंगळुरू येथे इलेक्ट्रॉनिक्स पार्कसह सेमीकंडक्टर डिझाईन हब उभारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. नोएडा (उत्तर प्रदेश) येथे Vedanta-Foxconn यांची भागीदारी कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेत.