
Car hit scene, male person lying on the floor in front of a car
लोणी काळभोरमध्ये घडली घटना
पुणे : सिगारेट उधारीवर दिली नाही, या शुल्लक कारणावरून एकाने भरधाव वेगाने दुचाकी चालवून टपरी चालकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी (१ नोव्हेंबर) रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात टपरी चालकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी कुंजीरवाडी येथील तरुणावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगन्नाथ चंद्रकांत जाधव (वय ३३, रा. कुंजीरवाडी, पेटकर वस्ती, ता- हवेली जि पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. विकी ऊर्फ विकास शिंदे (रा. पेटकरवस्ती, कुंजीरवाडी ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगन्नाथ जाधव हे पानटपरी चालक आहेत. विकी शिंदे याने जाधव यांना उधार सिगारेट मागितली होती. यावेळी जाधव यांनी उधार सिगारेट देण्यास नकार दिला होता. याचा राग शिंदे याने धरला होता. शुक्रवारी फिर्यादी जाधव व त्यांचा भाऊ बापुराव जाधव दुचाकीवरून घरी चालले होते. तेव्हा विकी शिंदे याने त्याच्या ताब्यातील दुचाकीने फिर्यादी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. फिर्यादी व त्यांचा भाऊ मोटारसायकलसह खाली पडले.
या धडकेत फिर्यादी यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. यावेळी विकी शिंदे याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली व नादाला लागायचे नाही, अशी धमकीही दिली. जाधव यांच्या फिर्यादीवरुन लोणी काळभोर पोलीस ठाण्यात शिंदे याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), १२६(२), ३५२, ३५१ (२) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अमोल घोडके पुढील तपास करीत आहेत.