
पुणे : प्रतिजैविकांचा (एंटीबायोटिक्स) चुकीचा आणि अतिरेकी वापर केवळ औषधे निष्प्रभ बनवत नाही, तर भविष्यातील गंभीर आरोग्य संकटालाही आमंत्रण देत असल्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. अँटी मायक्रोबियल रेसिस्टन्स (एएमआर) हा आजार जगासमोरील सर्वात मोठ्या सार्वजनिक आरोग्य समस्यांपैकी एक मानले जात असून, जीवाणू, विषाणू, बुरशी आणि परजीवी यांसारख्या सूक्ष्मजीवांवर प्रभावी असलेली औषधे आता परिणामकारक राहात नसल्याचे समोर आले आहे. परिणामी, संसर्गजन्य आजारांवरील उपचार अधिक कठीण, दीर्घकालीन, खर्चिक आणि काही प्रकरणांत जीवघेणे ठरत आहेत. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप यांसारख्या व्हायरल आजारांमध्ये चुकीने अँटीबायोटिक वापरणे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे, उपचारांचा पूर्ण कोर्स न पाळणे, तसेच उरलेली औषधे भविष्यात पुन्हा वापरणे किंवा इतरांना देण्याचे टाळावे असे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
याशिवाय रुग्णालयांमध्ये अपुरी संसर्ग नियंत्रण व्यवस्था आणि जनावरांमध्ये किंवा शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रतिजैविकांचाही परिणाम मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याच पार्श्वभूमीवर, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाने नागरिकांना स्वच्छता, सावधगिरी आणि जबाबदारीपूर्ण औषध वापराचे आवाहन केले आहे. जागतिक प्रतिजैविक प्रतिकार जागरूकता सप्ताह 2025 साजरा होत असून, यावर्षीची थीम “आत्ताच कृती करा: आपले वर्तमान वाचवा, आपले भविष्य सुरक्षित करा” अशी जाहीर करण्यात आली आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जंतुसंसर्ग टाळण्यासाठी हात धुण्याची सवय, स्वच्छ पाणी आणि अन्न यांचा वापर, तसेच लसीकरण वेळेवर आणि पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रतिजैविके केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावीत आणि सांगितलेला उपचारकालावधी पूर्ण करणे अनिवार्य आहे. स्वतःहून औषधांची देवाणघेवाण किंवा पुनर्वापर केल्यास भविष्यात प्रतिकारशक्ती वाढलेले जिवाणू अधिक घातक ठरू शकतात, असा आरोग्य विभागाने स्पष्ट इशारा दिला आहे.
रुग्णालयांनीही संसर्ग नियंत्रण उपाय काटेकोरपणे राबवणे, प्रतिजैविकांचा विवेकी वापर करणे आणि रुग्णांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे शासनाने निर्देश दिले आहेत.
आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. नीना बोरांडे आणि सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी सांगितले की, जनसहभाग, जाणीवपूर्वक औषध वापर आणि वेळेवर उपचार हाच एएमआर रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. नागरिकांनी शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करून “जबाबदारीने औषधांचा वापर” ही संकल्पना अंगीकारल्यास भविष्यातील गंभीर संसर्गापासून बचाव करणे शक्य आहे.







