
पोलीस अंमलदार गणेश जगतापचा आणखी एक कारनामा
पत्नीला कॅन्सर झाल्याचे सांगून महिलेकडून पैसे, दागिने घेऊन केली फसवणुक, गुन्हा दाखल
पुणे : एकाच वसाहतीत राहत असल्याचा फायदा घेऊन सासरी गेल्या महिलेला पत्नीला कॅन्सर झाल्याची बतावणी करुन तिच्याकडून अडीच लाख रुपये व ६ तोळे सोन्याचे दागिने घेऊन पोलीस अंमलदाराने फसवणुक केल्याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे़
गणेश अशोक जगताप (वय ५२, रा. कावेरीनगर पोलीस वसाहत, वाकड) असे या पोलिसाचे नाव आहे. राष्ट्रपती पदक मिळविण्यासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करुन फसवणुक करण्याबरोबरच गणेश जगताप याच्यावर यापूर्वी किमान ३ गुन्हे दाखल आहेत़
याबाबत सुखसागरनगरमध्ये राहणाºया एका ४३ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार डिसेंबर २०१९ पासून आतापर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी याचे वडिल पोलीस खात्यात असल्याने त्या औंध येथील बॉडी लाईन पोलीस वसाहतीत रहात होत्या़ त्यामुळे त्या गणेश अशोक जगताप याला ओळखत होत्या. दोन्ही कुटुंबाचे एकमेकांच्या घरी जाणे येणे होते.
त्या डिसेंबर २०१९ मध्ये सासरी नारायणगाव येथे असताना गणेश जगताप याने त्यांना फोन केला. त्याने सांगितले की, बायकोला कॅन्सर झाला आहे. घरातील सर्वांना कोरोना झाला आहे. मुलगीचे शिक्षण चालू असल्याने पैशाची आवश्यकता आहे. त्यांनी १ लाख रुपये बँकेतून काढले. गणेश जगताप हा घरी येऊन त्याने एक महिन्यात परत देतो, असे सांगून १ लाख रुपये घेऊन गेला. त्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये गणेश जगताप याने मुलीच्या शिक्षणासाठी व त्याच्या पत्नीवरील औषधोपचारासाठी पैसे मागितले. त्याने खूप विनवणी केली. दागिने मागितले. सोने गहाण ठेवून पैसे घेतो व दोन महिन्यात सोने व पैसे परत देतो, असे सांगितल्याने त्यांनी लग्नातील त्यांच्याकडील ३० ग्रॅमचे मंगळसुत्र, १२ ग्रॅमचा नेकलेस, गंठण, कानातील टॉप्स असे ६ तोळ्याचे दागिने त्याला दिले. त्यानंतर त्याने वेळोवेळी मुलीच्या शिक्षणासाठी पैसे मागून घेतले. २०२३ पर्यंत वारंवार तो पैसे मागून घेत होता. अशा प्रकारे २ लाख ५७ हजार रुपये व ६ तोळे वजनाचे दागिने असा ऐवज त्याने अद्यापपर्यंत परत केला नाही, म्हणून शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करीत आहेत.
गणेश जगताप याने यापूर्वी राष्ट्रपती पदक मिळावे यासाठी दोन लिपिकांना हाताशी धरुन पोलीस रेकॉर्डमध्ये फेरफार केली आहे. त्याचा गुन्हा दाखल आहे. त्याचबरोबर एका महिलेची त्याने ७३ तोळे सोने व १७ लाख रुपये घेऊन फसवणुक केली आहे. औंधमधील एका ज्वेलर्समधून उधारीवर सोन्याचे दागिने घेऊन साडेआठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे किमान ३ गुन्हे यापूर्वी गणेश जगताप दाखल आहेत.