
टेलिकॉम कर्मचाऱ्याला धमकावत त्याच्या नावावर घेतले सीमकार्ड
विविध बँकांमध्ये उघडले त्याआधारे खाते
पुणे : स्वत:ला ‘बॉस’ म्हणवून घेण्याची हौस असलेल्या कुख्यात गुंड नीलेश घायवळ याने शेवटचे चार क्रमांक ८०५५ असलेला मोबाईल क्रमांक घेण्यासाठी एका टेलिकॉम कर्मचाऱ्याला धमकावल्याचे समोर आले आहे. या कर्मचाऱ्याच्या आधार कार्डचा वापर करून त्याआधारे त्याच्याच नावावर सीमकार्ड घेऊन मागील पाच वर्षांपासून घायवळ वापर असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश बन्सीलाल गायवळ (रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड) याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ४२०, ५०४, ५०६ (२), माहिती तंत्रज्ञान कायदा सन २००० चे कलम ६६ (सी), टेलीकम्युनिकेशन अॅक्ट २०२३ चे कलम ४२ (३) (सी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १३ जानेवारी २०२० रोजी रातरी ८ ते आजपर्यंत घडला. याप्रकरणी एका तरुणाने फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा एका टेलिकॉम कंपनीत काम करतो. आरोपी गायवळ याने १३ जानेवारी २०२० रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीला जबरदस्तीने बोलावून घेतले. त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. फिर्यादीच्या ऑनलाईन आधारकार्डचा वापर करुन ‘बॉस’ अक्षर येणारे जिओ कंपनीचे सिमकार्ड नंबर ‘९७६७७७८०५५’ हे सीमकार्ड फिर्यादी तरुणाच्या नावावर घेतले. फिर्यादीच्या नावावर घेतलेले हे सीमकार्ड आजपर्यंत घायवळ स्वत:चे असल्याचे भासवित वापरत होता. त्याच्या आधारे त्याने वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडली. त्याव्दारे आर्थिक व्यवहार करुन फिर्यादी तसेच विविध बँकांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.