
४५ लाखांची खंडणी उकळणार्या नीलेश घायवळ याच्यावर आणखी एक गुन्हा
मिलेनियम नॅशनल स्कुलमध्ये पुरवठा करणार्या महिलेला धमकाविले, वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : मिलेनियम नॅशनल स्कुलमधील कॅट्रींनला खाद्य पदार्थ व वाहतुकीची सुविधा पुरविणार्या कंपनीतील महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून ४४ लाख ३६ हजार ५२३ रुपयांची खंडणी उकळणार्या नीलेश घायवळ, त्याचा भाऊ सचिन घायवळ यांच्यासह १३ जणांवर वारजे पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
बापू कदम, सचिन गायवळ, नीलेश गायवळ, पप्पू दळवी, अभि गोरडे, दीपक आमले,बाबू वीर, अमोल बंडगर, बाबू पिसाळ, अमोल लाखे, संदीप फाटक, बबलु गोळेकर, बबलु सुरवसे (सर्व रा. वारजे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार मार्च २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान घडला आहे. नीलेश घायवळ याने पासपोर्टसाठी जसे आपले आडनाव गायवळ वापरले होते. तसेच इथेही त्याने व सचिनने आपले आडनाव गायवळ वापरले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांची भागीदारीमध्ये कंपनी आहे. कंपनीकडून मिलेनियम नॅशनल स्कुलच्या दोन शाळांना फुड व वाहतूक सुविधा पुरवल्या जातात. तेथील क्रीडा शिक्षक बापू कदम याने या महिलेची फेब्रुवारी २०२४ मध्ये कँटिनमध्ये भेट घेतली. त्यांना सांगितले की, माझी कल्याणी नावाची दुध डेअरी आहे. आम्ही दुध आणि पनीर कँटीनला पुरवतो. तुम्ही ही आमच्याकडून माल घ्या. त्याचा गुन्हेगारीत वावर असल्याचे माहिती असल्याने या मालासाठी त्यांनी आगाऊ २२लाख रुपये त्यांना दिले. पण त्याने माल पुरवला नाही. स्कूल च्या कामात अडचण नको म्हणून त्यांनी नेहमीच्या लोकांकडून माल घेतला. बापू कदम दरवेळी वेगवेगळी कारणे देत होता.
जानेवारी २०२५ मध्ये बापू कदम याने या महिलेची भेट घेतली. त्यांना सांगितले की, मी नीलेश गायवळ याच्यासाठी काम करतो. त्याचा भाऊ सचिन गायवळ हा स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कामाला आहे. तुम्हाला या वर्षी ही कॅन्टीनचा माल घेण्याच्या नावाखाली आम्हाला पैसे द्यावे लागतील. पैसे नाही दिले तर पोरांना सांगून तुमचा सर्व व्यवसाय बंद पडू. जर हे कोणाला काही सांगितले तर तुमचा कार्यक्रम करु, अशी धमकी दिली.
त्यानंतर काही दिवसांनी त्या मिलेनियम स्कूल च्या बाहेर पडत असताना बापू कदम याने त्यांची गाडी अडवली.तुम्ही या वषार्चे पैसे पाठवणार की नाही, असे विचारले. त्याचवेळी एका गाडीतून सचिन गायवळ, नीलेश गायवळ व त्याचे साथीदार आले. बापू कदम याने त्यांच्या कडे इशारा करून हे सर्व नीलेश गायवळ यांच्यासाठी काम करतात. तेव्हा सचिन गायवळ म्हणाला, की ओ मॅडम, तुम्हाला जीवंत रहायचे की नाही. लवकर बापूच्या अकाउंट वर पैसे जमा करा. त्यामुळे त्यांनी घाबरून २२ लाख ३३ हजार रुपये बापू कदमने दिलेल्या खात्यात जमा केले. त्यावेळी त्यांनी घाबरून तक्रार दिली नव्हती. नंतर त्यांना समजले की बापू कदम यांची कल्याणी डेअरी अस्तित्वात नाही. पोलिस निरीक्षक प्रकाश धेंडे तपास करीत आहेत.