
गॅगस्टर निलेश घायवळ याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल
कोथरुड पोलिसांनी घरातून जप्त केले २ काडतुसे आणि ४ रिकाम्या पुंगळ्या
पुणे : गॅगस्टर निलेश घायवळ याच्याबाबत रोज नवीन नवीन माहिती समोर येत आहे. कोथरुड पोलिसांनी घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घेतलेल्या घरझडतीतून गॅगस्टर निलेश घायवळ याच्या घरात २ काडतुसे आणि ४ रिकाम्या पुंगळ्या आढळून आले आहेत. त्या त्याने किचनमध्ये लपवून ठेवल्या होत्या.
या बाबत सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोथरुड पोलिसांनी निलेश घायवळ याच्यासह त्याच्या टोळीवर मोका कारवाई केली आहे. त्याच्या अगोदरच निलेश घायवळ हा परदेशात पळून गेला आहे. त्याचा शोध सर्वत्र घेतला जात आहे. त्याच्या पासपोर्ट संबंधात काही माहिती मिळते का यासाठी पोलिसांनी शनिवारी दुपारी २ वाजता निलेश घायवळ याच्या शास्त्रीनगर येथील संत ज्ञानेश्वर कॉलनीतील घरात झडती घेतली. ही झडती रात्री ९ वाजेपर्यंत चालली. त्यात घरातील दुसºया मजल्यावरील किचनमध्ये २ जिवंत काडतुसे व ४ रिकाम्या पुंगळ्या आढळून आल्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या आहे. परवाना नसताना अवैधपणे स्वत:कडे जिवंत काडतुसे व पुंगळ्या ठेवून टोळीतील सदस्यांना गुन्हेगारी कृत्य करण्याकरीता पुरवठा, विक्री अथवा हस्तांतर करण्याकरीता त्याने त्या ठेवल्या असल्याचे दिसून आले. घरात रिकाम्या पुंगळ्या सापडल्या़. त्या कोणत्या गुन्ह्यात वापरल्या गेल्या आहेत का, याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक नेमाने तपास करीत आहेत.