
जुन्या वाड्यांऐवजी झोपडपट्टी दाखवून शेकडो कोटींचे ‘टीडीआर’ लाटण्याचा प्रयत्न?
भाजपाचे नेते उज्वल केसकर यांचा एसआरएच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
पुणे महापालिकेचे माजी आयुक्त कुणाल कुमार यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधीकरणाकडून विशिष्ठ तक्त्यात ठराविक मुद्दयांबाबत क्षेत्रीय कार्यालयाकडून झोपडपट्टी सदृश्य अहवाल शिर्षकाखाली केवळ विशिष्ठ तपशील मागवले होते. अशा जागांवर झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करणे, त्यावर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण नियमावलीनुसार रहिवासी भाडेकरूंना झोपडपट्टीधारक म्हणून विनामोबादला सदनिका, गाळे देणे, त्यापोटी विकसकास मोठ्याप्रमाणात चटई क्षेत्राचा (टीडीआर) मोबदला देणे याबाबी होत असल्याचे सकृत दर्शनी निदर्शनास येत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर एसआरएला असे कळविण्यात आले होते की, ज्या प्रकरणांमध्ये पालिकेकडून अहवाल पाठविण्यात आलेले आहेत, परंतु झोपडपट्टी पुनर्वसन प्राधीकरणाकडून अध्याप प्रस्ताव मान्य करण्यात आलेले नाहीत, असे सर्व प्रस्ताव स्थगित करण्यात यावेत व त्या सर्व प्रकरणांचा अहवाल सादर करण्यात यावा. परंतु, या आदेशाचा ‘एसआरए’ला विसर पडला आहे का? पालिकेने स्थगिती दिल्यानंतर एसआरएकडून या भागातील वाड्यांच्या ठिकाणी एसआरए प्रकल्प राबविण्याचा घाट का घातला जात आहे, असा सवाल केसकर यांनी केला आहे. शहरातील जूने वाडे म्हणजे झोपडपट्टी नाही. असे असताना देखील साडेचारशे कोटी रुपये घश्यात घालण्याासाठी हा खेळ खेळला जात असल्याचा आरोप केसकर यांनी केला आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे सध्या झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्राधिकरण न राहता फक्त पुणे शहरातील जुने वाडे आणि इमारती यांच्या पुनर्वसनासाठी बनलेले प्राधिकरण आहे. झोपडपट्टी सदृश्य असा अभिप्राय वॉर्ड ऑफिसरच्या माध्यमातून त्यांच्या अभियंत्याकडून घेतात आणि जुने वाडे हे झोपडपट्टी सदृश असल्याचे जाहीर करून झोपडपट्टी पुनर्वसन योजना जाहीर करतात. असा आरोप माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे, संजय बालगुडे यांनी केला होता. याकडे माजी आयुक्त विक्रम कुमार यांनी गंभीरपणे लक्ष दिले होते. त्यानंतर त्यांनी तात्काळ या प्रकल्पास स्थगितीचे आदेश दिले होते. तसेच एक समिती नेमली होती, त्या समितीच्या समोर एस आर ए यांनी काही अहवाल सादर केला, त्यावर समितीने निर्णय करायचा आहे हे चालू असतानाच हा देखील प्रस्ताव करण्याचा प्रयत्न जोरदार चालू आहे. ही बाब केसकर यांनी पालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांच्या निर्देशनास आणली आहे.
माजी नगरसेवकांनी पालिका आयुक्तांना मागणी केली होती की, अभिप्रायामुळे पालिकेचे नुकसान आहे. कारण पालिकेला विकास शुल्क मिळत नाही. विकासकाला शुल्क भरावे लागत नाही आणि टीडीआर विकून करोडो रुपये मिळतात. त्यामुळे पालिकेच्या वार्ड रचनेतील अभियंत्यांना हाताशी धरून हे सगळे षडयंत्र चालू आहे. पालिकेच्या पेठांच्या मध्ये जवळपास २० हजार वाडे आहेत, त्यांचा विचार केला तर हा ५० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार घोटाळा आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांनी पालिका आयुक्त यांना विनंती केली होती की आयुक्तांच्या परवानगीशिवाय कुठल्याही अभियंत्याने झोपडपट्टी सदृश्य असा अभिप्राय देऊ नये. त्यानुसार माजी आयुक्तांनी आदेश जारी केले होते.
उपस्थित झालेले प्रश्न
– बुधवार पेठे मधील घर क्रमांक २७६अ, 2७७ ब, २७९, २८०, २८१, २८२, ८५३, ८५३ या ठिकाणी पीएमपीचे पार्किंग राखीव आहे.
– २७७ (अ) (ब) मुजावर वाडा १०,००० चौरस फुटाचा असून काही भाग पडला आहे, भाडेकरू बाहेर राहायला गेली आहे तर वीस लोक तिथेच राहतात.
– २७९ बुधवार पेठ वीस वर्षांपूर्वी पालिकेने ताब्यात घेतला त्या ठिकाणी आरोग्याची कोठी आहे तेथील भाडे करूनचे पुनर्वसन दत्तवाडी येथे केले आहे.
– २८० ठकार वाडा हा जमीन दोस्त झालेला आहे आठ-दहा भाडेकरू बाहेर राहतात.
– २८१ जोशी वाडा राजकुमार अग्रवाल यांच्या मालकीचा आहे
– २८२ बुधवार पेठ राजकुमार अग्रवाल बन्सीलाल यांच्या मालकीची असून त्या ठिकाणी तीन मजली पक्की इमारत आहे.
– ८५३ बुधवार पेठ पिंगळे ढेरे फिरोज भाई हे दुकानदार दोन भाडेकरी इमारत मोडकळीस आली आहे पार्किंगचे आरक्षण आहे.
– ८५४ बुधवार पेठ वाडेकर बंधू गीता विहार पॉप्युलर वॉच पूर्ण पोशात लक्ष्मी रोड फेसिंग असून पार्किंगचे आरक्षण आहे.
महापालिकेच्या आयुक्तांच्या मान्यतेनेच एस आर ए प्रकल्प राबवण्यात येत आहे. आम्ही जी पूर्व सूचना जाहीर केली आहे, त्याला काही हरकती आल्यास त्याचा विचार केला जाईल. पुण्यातील सिटी पोस्ट कार्यालयाच्या लगत असलेल्या जागेवर हा प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव विकसक विशाल धनवडे यांनी पालिकेला सादर केला आहे, त्या बाबतचा प्रकल्प आहे. या जागेची पाहणी ‘एसआरए’च्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. या जागेवर एकही वाडा नाही. सध्या हा केवळ प्रस्ताव आहे, जाहीर केलेल्या सूचनेवर आलेल्या हरकतीचा विचार केला जाईल. त्यानंतर अंतिम मंजुरी दिले जाईल.– निलेश गटने, मुख्य कार्यकारी अधिकारी, एसआरए