
तब्ब्ल १७ वर्षांनंतर लागला निकाल : राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने दिला ऐतिहासिक निकाल
मुंबई : नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये २००८ मध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी जवळपास १७ वर्षांनंतर राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) विशेष न्यायालयाने गुरुवारी ऐतिहासिक निकाल दिला. या प्रकरणात भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सातही आरोपींना निर्दोष घोषित करण्यात आले. हा खटला अत्यंत संवेदनशील मानला जात होता, कारण त्यात ‘भगवा दहशतवाद’ हा उल्लेख पहिल्यांदाच चर्चेत आला होता.
२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव शहरातील एका मशिदीजवळ एका मोटरसायकलवर बांधलेल्या स्फोटक उपकरणाचा स्फोट झाला होता. या स्फोटात सहा लोकांचा मृत्यू झाला आणि १०१ जण जखमी झाले होते. या स्फोटानंतर देशभरात खळबळ उडाली होती. विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी या खटल्याचा निकाल देताना स्पष्ट केलं की, सरकारी वकिलांनी मांडलेला खटला आणि तपास प्रक्रियेमध्ये अनेक त्रुटी होत्या. त्यांनी नमूद केलं की, आरोपींविरुद्ध आरोप सिद्ध करण्यास पुरेसे ठोस व विश्वसनीय पुरावे उपलब्ध नव्हते. त्यामुळे आरोपींना ‘संशयाचा फायदा’ द्यावा लागतो.
न्यायालयाने म्हटलं की, स्फोटात वापरलेली मोटरसायकल प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या नावे नोंदणीकृत होती, हा दावा न्यायालयात सिद्ध होऊ शकला नाही. तसंच, बाईकवर लावलेल्या स्फोटकांमुळेच स्फोट झाला, हेही पुराव्याअभावी सिद्ध झालं नाही. त्यामुळे या प्रकरणावर ‘गैर कायदेशीर कृत्य प्रतिबंध अधिनियम’ म्हणजेच UAPA लागू होणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.
या प्रकरणातील सात आरोपी गुरुवारी सकाळी दक्षिण मुंबईतील सत्र न्यायालयात उपस्थित होते. ते सर्वजण जामिनावर बाहेर होते. यामध्ये प्रज्ञा सिंह ठाकू, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे. या सर्वांवर UAPA, भारतीय दंड संहिता आणि शस्त्र अधिनियमांतर्गत दहशतवादी कारवायांचे आरोप ठेवण्यात आले होते. सरकारी वकिलांनी दावा केला होता की, स्थानिक मुस्लिम समुदायात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने या उजव्या विचारसरणीच्या लोकांनी कट रचून स्फोट घडवून आणला.
या निकालामुळे एकीकडे आरोपींना मोठा दिलासा मिळाला असून सरकार आणि NIA यांच्याकडून पुढे उच्च न्यायालयात अपील केलं जाईल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.