
पुरोगामी पुण्यात सुनेसोबत सासरच्यांचे अघोरी कृत्य
पुणे : विवाहितेला आर्थिक फायद्यासाठी सासरच्या लोकांनी मानसिक आणि शारीरिक छळ करून त्रास दिला तसेच तिला अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये पूजाअर्चा करून नग्न होऊन झोपण्यास भाग पाडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता ८५, ७४, ७५, ११५ (२) (३) (५) प्रमाणे सह महाराष्ट्र नरवळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत तसेच त्यांचे समोर उच्चाटन करणे बाबत अधिनियम २०१३ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती (वय २५), दीर (वय २८), सासू (वय ५५), सासरे (वय ५८) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी २२ वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. या तरुणीचे मे २०२३ रोजी लग्न झाले होते. आरोपींनी तिला पैशांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ करून त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच अघोरी प्रथा पाळण्यास जबरदस्ती केली. अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री घरामध्ये पूजाअर्चा करून आरोपींसह तिला नग्न होऊन झोपण्यास सांगण्यात आले.
मात्र, तिने त्याला नकार दिला. त्यामुळे आरोपींनी तिच्यावर लैंगिक हल्ला करून विनयभंग केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच, तिला झालेले मूल त्यांचे नसून मुल आपले आहे हे सिद्ध करण्यासाठी अघोरी परीक्षा देण्याची जबरदस्ती केली. त्यानंतर, तिला नांदविण्यास नकार देण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. याबाबतची तक्रार पोलिसांकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एस. कोलेवाड करीत आहेत.