
पुणे : बालेवाडी येथील एजंट जॅक बारमध्ये होळी पार्टी करण्यासाठी आलेल्या तरुण-तरुणीने मद्यधुंद अवस्थेत राडा घातला. आपसात झालेल्या वादातून गोंधळ घातला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण करण्यात आला. तसेच, पोलीस ठाण्यात देखील आरडाओरडा करून पोलिसांना आत्महत्या करण्याची धमकी देण्यात आल्याप्रकरणी दोघांविरुद्ध बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारात महिला पोलीस उपनिरीक्षकाला चावा घेतल्याचाही आरोप आहे.
मानसी चंपलाल परिहार (वय २४, रा. पिंपळे सौदागर) आणि युवराज निलेश परतानी (वय २४, रा. पाषाण) अशी गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, २२१, ३५२, ३५१(२), ११५(२), १३१, ३(५) तसेच महाराष्ट्र मद्यनिषेध कायद्याच्या कलम ८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया मांढरे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी येथील ‘एजंट जॅक बार’ मध्ये ३ मार्च रोजी रात्री ११.४० ते ४ मार्च पहाटे ५.३० दरम्यान आरोपींमध्ये वाद झाला. या वादातून दोघांनी बारमध्ये गोंधळ घालत पोलिसांच्या कामकाजात अडथळा निर्माण केला.
तक्रारीनुसार, आरोपींनी पोलीस ठाण्यातही गोंधळ घालत पोलिसांच्या अंगावर धावून जात झटापट केली. पोलिसांच्या गणवेशाला हात घालत धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी आरोपी मानसी परिहार हिने महिला उपनिरीक्षक सुप्रिया मांढरे यांच्या हाताला चावा घेतल्याचा आरोप आहे.
तसेच आरोपींनी मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आत्महत्या करून पोलिसांची नावे लिहून ठेवण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरोपी युवराज परतानी यानेही शिवीगाळ करून पोलिसांना धमकी दिल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाथरे करीत आहेत.






