
वन विभागाकडून दोघांना निसर्ग हॉटेलमधून अटक
#पुणे : व्हेल माशाची उलटी आणि चिंकाराच्या शिंगांची तस्करी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मौजे भिलारवाडी (ता. हवेली) येथील निसर्ग हॉटेलमध्ये छापा टाकत ही कारवाई करण्यात आली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तस्करीचा हा मुद्देमाल जप्त केला. वन विभागाने याप्रकरणी गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली आहे.
हेमराव सिकंदर मेहता (रा. बालाजीनगर) आणि ऋतिक नवनाथ लेकुरवाळे (रा. थेरगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या दोघांना न्यायालयाने २ डिसेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहता आणि लेकुरवाळे हे दोघे व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रेस) आणि चिंकाराची शिंगे घेऊन विक्रीसाठी आल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार, अधिकाऱ्यांनी भिलारवाडी येथील निसर्ग हॉटेलमध्ये छापा टाकत दोघांना ताब्यात घेतले.
या दोघांकडून ७५ लाख रुपयांची व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रेस) आणि २५ हजार रुपये किमतीची चिंकाराची शिंगे जप्त करण्यात आली. सहायक वनसंरक्षक मंगेश ताठे यांच्या नेतृत्वाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांनी ही कारवाई केली. त्यांच्यासमवेत वनपरिमंडळ अधिकारी विशाल यादव, प्रमोद रासकर, वैभव बाबर, वनरक्षक संभाजी गायकवाड, अनिल राठोड, राजकुमार जाधव, श्रीराम जगताप, ओंकार गुंड, विनायक ताठे सहभागी झाले.