
पुणे : ‘नो पार्किंग’मध्ये लावलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसांना अटकाव करीत त्यांना दोन तरुणींनी चपलेने मारहाण केल्याची घटना हडपसरमध्ये मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बालिका सूर्यवंशी आणि संगीत लांडगे अशी गुन्हा दाखल झालेल्या तरुणींची नावे आहेत. याप्रकरणी एका पोलीस हवालदाराने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हवालदार हडपसर वाहतूक विभागात कार्यरत आहेत. ते आणि त्यांचे सहकारी ‘नो पार्किंग’मध्ये लावण्यात आलेल्या वाहनांवर कारवाई करीत होते. आरोपी महिलांनी गाडीतळ परिसरात नो पार्किंगमध्ये दुचाकी (एमएच २४, बीक्यु ७५३०) लावलेली होती. या दुचाकीवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपी महिलांची दुचाकी उचलून कर्मचारी टोईंग व्हॅनमध्ये ठेवत होते. त्या वेळी या आरोपी महिलांनी कारवाईला विरोध केला. तसेच, फिर्यादी हवालदार यांच्याशी वाद घालत कारवाईमध्ये अडथळा निर्माण केला.
आरोपी महिलांनी हवालदार यांना चपलेने मारहाण करुन धक्काबुक्की करीत धमकावले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख तपास करत आहेत.