
श्री गौड ब्राह्मण समाज, श्री चारभुजानाथ मंदिर रामकथा समितीतर्फे श्रीराम कथा प्रेम यज्ञ सोहळ्याला प्रारंभ
पुणे : श्रीगौड ब्राह्मण समाज, श्री चारभुजानाथ मंदिर रामकथा समितीतर्फे श्रीराम कथा प्रेम यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचा प्रारंभ भव्य कलश यात्रेने झाला. पारंपरिक वेशात कलश घेऊन एक हजार महिला यात्रेत सहभागी झाल्या होत्या.
बिबवेवाडी कोंढवा रस्ता येथील आईमाता मंदिर ते चित्रकूट धाम अशी कलश यात्रा काढण्यात आली. सोहळ्यात निरुपण करणारे प्रेममूर्ती पूज्य संत श्री प्रेमभूषणजी महाराज यांचे कृपापात्र पूज्य राजन जी महाराज आसनस्थ झालेला रथ यात्रेत सहभागी झाला. श्रद्धा, भक्ती आणि प्रभू श्रीरामाच्या आदर्शांचा संदेश देत ही कलश यात्रा काढण्यात आली. तब्बल एक हजाराहून अधिक महिला, पुरुष आणि लहान मुले ही या रथयात्रेत सहभागी झाले होती.
पूज्य राजन जी महाराज म्हणाले, शिवाचा अर्थ आहे कल्याण आणि शिव हे कलियुगातील प्रत्येकाचे कल्याण करणारे भगवंत आहेत. ज्या कथेमध्ये कोणतेही विकार नाही, पवित्र आणि निर्मळ अशी कथा म्हणजे विमल कथा. भगवंताची कथाच ही विमल कथा असू शकते. भगवतांची ही कथा ऐकली तरी जीवनातील दुख कमी होऊन मन:शक्ती वाढते.
भगवंताची कथा ऐकल्यामुळे जीवनातील क्रोध, मद, मोह, मत्सर हे विकार हळूहळू नाहीसे होतील. आपण छोटी गोष्ट केली तरी त्याचे श्रेय घेतो, परंतु भगवंताने तर संपूर्ण सृष्टी बनवली आहे. मी पणातून मत्सर निर्माण होतो. हे मी केले नाही भगवंताने करून घेतले, असे आपण जेव्हा म्हणू लागतो, तेव्हा आपल्यातील मत्सर भाव नाहीसा होतो,असेही त्यांनी सांगितले.
कथा सोहळ्याचे दि. १४ ते २२ डिसेंबर दरम्यान दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ७ यावेळेत चित्रकूट धाम, वर्धमान लॉन्स समोर, बिबवेवाडी कोंढवा रस्ता येथे करण्यात आले आहे. श्रीराम कथा प्रेमयज्ञ सोहळ्यात श्रीराम कथा महिमा आणि शिव-पार्वती विवाह, श्रीराम जन्म उत्सव, श्री बाल लीला, श्री सीताराम विवाह महोत्सव, श्री केवट प्रेम, श्री राम मंगल यात्रा, श्री भरत चरित्र, श्री शबरी प्रेम, सुंदरकाण्ड आणि श्री राम राज्याभिषेक याविषयी पूज्य राजनजी महाराज हे निरूपण करणार आहेत. सोहळ्याकरिता प्रवेश विनामूल्य असून रामभक्तांनी मोठया संख्यने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.