
आरोपीकडून ११ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
#पुणे : गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने एका सराईत घरफोड्याला जेरबंद केले. त्याच्याकडून ११ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चोरीचा मुद्देमाल विकण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. त्याने काही दिवसांपूर्वी हडपसर येथील मार्वेल आर्को सोसायटीमधील एका सदनिकेत हात साफ केला होता.
अनिल मिनसिंग खडका (वय २५, रा. केशव चौक, माळवाडी, हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १७३.५०० ग्रॅम वजनाचे ११ लाख ५९ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. आरोपी खडका हा मूळचा नेपाळचा राहणारा आहे. सोमवार, २५ नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पथक गस्त घालीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार तानाजी देशमुख व अमित कांबळे यांना खबऱ्याने आरोपीबाबत माहिती दिली. आरोपी चोरीचे सोन्याचे दागिने विकण्याकरीता माळवाडी येथील अमरधाम स्मशानभूमी येथे येणार असल्याची माहिती खबऱ्याने दिली होती.
पोलिसांनी अमरधाम स्मशानभूमीजवळ सापळा लावला. आरोपी खडका हा संशयास्पद स्थितीमध्ये याठिकाणी वावरताना पोलिसांच्या दृष्टीस पडला. त्याला शिताफीने पकडून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी पकडताच तो सतत पॅन्टच्या खिशामध्ये हात घालून काहीतरी लपविण्याचा प्रयत्न करीत होता. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता चोरीचा मुद्देमाल मिळाला. त्याला पुढील कारवाईसाठी हडपसर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. ही कारवाई युनिट पाचचे पोलीस निरीक्षक युवराज हांडे, सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस अंमलदार अमित कांबळे, तानाजी देशमुख, प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, विनोद निंभोरे, विनोद शिवले, स्वाती गावडे, पल्लवी मोरे, शुभांगी म्हाळसेकर, अकबर शेख, राहुल ढमढेरे यांच्या पथकाने केली.