
स्वच्छ संस्थेच्या कचरावेचक शालन वायला यांचा विश्वासाचा दाखला
पुणे : रस्त्यामध्ये सापडलेली दहा लाख रुपयांची रोकड प्रामाणिकपणे कचरा वेचक महिलेने मूळ मालकाला परत केली होती. त्यानंतर, आता पुन्हा आणखी एका कचरा वेचक महिलेचे प्रामाणिकपणाचे उदाहरण समोर आले आहे. कचरा वर्गीकरण करताना सापडलेली एक तोळे वजनाची सोन्याची अंगठी मूळ मालक असलेल्या महिलेला परत केली. ही घटना सोमवारी, २२ डिसेंबर रोजी घडली.
शालन लक्ष्मण वायला असे या प्रामाणिक कचरा वेचक महिलेचे नाव आहे. ही महिला ‘स्वच्छ सेवा पुणे सहकारी संस्थे’साठी काम करतात. संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, शालन वायला या २२ डिसेंबर २०२५ रोजी नेहमीप्रमाणे कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये त्यांच्या नेमून दिलेल्या परिसरात दारोदार कचरा संकलनाचे काम करीत होत्या. काम संपल्यावर त्या परत आल्या आणि त्यानंतर कचऱ्याचे वर्गीकरण करायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना कचऱ्यातून एक तोळ्याची सोन्याची अंगठी सापडली. त्यांनी ती अंगठी बाजूला सुरक्षित ठेवली.
गेल्या १० वर्षांपासून शालन वायला ‘स्वच्छ’ कचरावेचक दारोदार कचरा संकलनाचे काम करत आहेत. तशाच त्या गुरुदेव रवींद्रनाथ टागोर विद्यालयाच्या माजी प्राचार्य जयश्री जगदाळे यांच्या घरामधून देखील कचरा घेतात. ही अंगठी जयश्री जगदाळे यांच्या सून प्रियंका जगदाळे यांच्या लग्नाची अंगठी होती. स्वयंपाक करताना मुलाच्या टिफिन बॉक्सच्या घाईगडबडीत अंगठी काढून ती कागदात गुंडाळली गेली आणि चुकून कचऱ्याच्या डब्यात टाकली गेली. अंगठी हरवल्याचे लक्षात येताच घरच्यांनी शोध सुरू केला. दरम्यान, त्यांनी शालन वायला यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी सापडलेली अंगठी आपल्याकडेच असून टी सुरक्षित असल्याचे सांगितले. तसेच, कोणतीही लालसा न ठेवता प्रामाणिकपणे परत केली.
या संदर्भात बोलताना जयश्री जगदाळे यांनी सांगितले की, “या अंगठीची किंमत महत्त्वाची नाही, तर तिच्याशी जोडलेल्या भावना महत्त्वाच्या आहेत. ती माझ्या सूनबाईची लग्नाची अंगठी होती. शिक्षण क्षेत्रात काम करताना मी नेहमी विद्यार्थ्यांना कामात आणि आयुष्यात प्रामाणिकपणाचे महत्त्व सांगितले आहे. आज तोच प्रामाणिकपणा प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला.”
शालन वायला यांच्या प्रामाणिक वर्तनाने भारावून जाऊन त्यांनी त्यांचा साडी देऊन सत्कार केला. अशा प्रामाणिक कृतींना प्रोत्साहन मिळावे आणि इतरांसाठीही उदाहरण निर्माण व्हावे, हा या सत्कारामागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्वच्छ संस्थेचेही त्यांनी आभार मानले. कचरावेचकांचा प्रामाणिकपणा आणि सचोटी शहरापुढे मांडली जात असून, संस्थेची मूलभूत मूल्ये त्यांच्या कामातून स्पष्टपणे दिसून येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अलीकडेच स्वच्छच्या कचरावेचक अंजू माने यांनी रस्त्यावर सापडलेली दहा लाख रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग प्रामाणिकपणे परत करून दिल्याची घटना घडली होती. या घटना स्वच्छच्या कचरावेचक आणि नागरिक यांच्यात गेल्या २० वर्षांत तयार झालेल्या विश्वासाच्या नात्याचे प्रतीक आहेत. दररोज पुण्यातील लाखो नागरिकांना दारोदार कचरा संकलनाची सेवा देताना हा प्रामाणिकपणा सातत्याने दिसून येतो.







