
सिनेमाच्या प्रोड्युसरवर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; कराड पोलिसांकडे गुन्हा केला वर्ग
पुणे : सिनेमा आणि शॉर्ट फिल्म प्रोड्युसर असल्याचे सांगत तरुणीला अल्बम सॉंगमध्ये काम देण्याच्या बहाण्याने आयटीमध्ये काम करणाऱ्या एका तरुणीला कराड येथे नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात संबंधित प्रोड्युसरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७ जून २०२५ ते १७ ऑगस्ट २०२५ दरम्यान पुणे आणि कराड येथे घडला.
विशाल दीपक (रा. कराड, जि. सातारा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी २८ वर्षीय अभिनेत्रीने फिर्याद दिली आहे. हि तरुणी पुण्यामध्ये एका आयटी कंपनीमध्ये काम करते. ती पुण्यात नोकरीनिमित्त आलेली आहे. तिने एक वर्षापूर्वी ‘ओम तेजा प्रोडक्श्न’ नावाचा व्हॉटसअप ग्रुप जॉईन केला होता. या ग्रुपमध्ये शॉर्ट फिल्मसाठी मुलीची आवश्यकता असल्याची पोस्ट आरोपी विशाल दिपक याने टाकली होती. फिर्यादी तरुणीला अभिनयाची आवड असल्याने तिने ग्रुपमध्ये आरोपीकडे यासंदर्भात विचारणा केली. त्यावेळी विशाल दिपक याने स्वतःच्या मोबाईलनंबर फोन करून अल्बम सॉंगशुट साठी रिक्वायरमेंट पाठवली होती. त्यांच्यामध्ये या कामासंदर्भात बोलणी झाली. त्यानंतर फिर्यादी शुटींग करीता तयार झाली.
त्यानुसार, अल्बम सॉंगची शुटींग कराडला ठरली. ठरल्याप्रमाणे फिर्यादी ७ जून २०२५ रोजी कराडला गेली. आरोपी विशाल तिला घेण्यासाठी गेला होता. त्याच्या मोटारसायकलवरून ते कराडमधील गजानन सोसायटी येथे गेले. तेथे गेल्यावर आरोपीने हे त्याचेच घर असल्याचे तिला सांगितले. त्या घरामध्ये त्याचा भाऊ व वहिनी होते. त्यानंतर, ८ जून २०२५ रोजी सकाळी विशाल व अतुल जाधव असे कराडमधील शामगाव घाट येथे शुटींग करण्याकरीता गेले. अतुल जाधव शुटींग करण्याचे काम करत होता. दिवसभर अल्बम सॉंगचे शुटींग करुन संध्याकाळी सर्वजण विशालच्या घरी गेले. त्यानंतर पुन्हा ९ जून रोजी पुन्हा सकाळी हे तिघेही अल्बम सॉंगचे शुटींग करण्याकरीता सुरली घाटावर गेले. सायंकाळी शुटींग संपल्यानंतर आरोपी विशालने फिर्यादीला सोबत घेतले. तिला स्वतःच्या घरी न नेता सूर्या हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या शुभम रेसीडेन्सीमध्ये नेले. त्यावेळी या फ्लॅटमध्ये कोणीही नव्हते.
त्यासंदर्भात विचारणा केली असता त्याने अतुल जाधव याचा फ्लॅट असल्याचे सांगितले. थोड्या वेळाने काम काढून अतुल जाधव निघून गेला. त्यानंतर, आरोपी विशालने फिर्यादीसोबत लगट सुरु केली. तसेच, शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरु केला. फिर्यादी तरुणीने त्याला नकार देत विरोध केला मात्र, आरोपीने तिचे कपडे फाडून बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. काही वेळाने अतुल जाधव घरी परत आला. फिर्यादीने त्याला घरी जायचे आहे असे सांगितले. आरोपीच्या घरी जाऊन तिने बॅग घेतली आणि बसने पुण्याला परत आली.
त्यानंतर आरोपीने तिला फोन करून सॉरी म्हणून लवशिपमध्ये राहण्याबाबत विचारले. तिने त्याला केवळ फेंडशिपमध्ये राहून नॉर्मल बोलूया असे सांगितले. परंतु, आरोपीने तिला १५ ऑगस्ट रोजी फोन करुन ‘मला पुण्यात भेट, तु मला भेटली नाहीस तर मी तुझ्या क्लासमध्ये आणि कराडमध्ये तुझ्या ओळखीच्या लोकांच्या घरी जाऊन बदनामी करीन.’ अशी धमकी दिली. दरम्यान, त्याने सांगितल्याप्रमाणे काही जणांकडे जाऊन बदनामी केली. त्याच दिवशी त्याने टैक्स मेसेज करून ‘सॉरी माझे चुकले. मी पुण्यात येत आहे, तुला सॉरी बोलायला.’ असा मेसेज केला. त्यानंतर त्याने वारंवार फोन व मेसेज करून भेटण्यासाठी तगादा लावला. तसेच, अश्लील शूट केलेले व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.दरम्यान, १७ ऑगस्ट रोजी सकाळी हि तरुणी कामावर जात असताना आरोपी विशाल हा तिला आपला पाठलाग करीत असताना दिसला. त्याने तिला गाठत तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या तरुणीने रस्ता बदलून तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. तिने पोलिसांच्या ११२ नंबरवर कॉल केला. त्यानंतर, तो तिथून पसार झाला. त्यानंतर, तरुणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. चंदननगर पोलिसांनी हा गुन्हा दाखल करीत कराड पोलिसांकडे वर्ग केला आहे.