
करंगळीचा देखील घेतला चावा : मोड आलेले हरभरे खाल्ल्याने डोक्यात घातले मिक्सरचे भांडे
#पुणे : कौटुंबिक नातेसंबंधात पती-पत्नीमध्ये अनेकदा छोट्यामोठ्या कारणांवरून वादविवाद आणि भांडणे होत असतात. कधी कधी ही भांडणे टोकाला जातात. प्रसंगी पतीकडून पत्नीला मारहाण करण्यात आल्याच्या घटना देखील घडतात. पण, पत्नीने पतीलाच चोपल्याची घटना विरळाच… अशीच एक घटना सोमवार पेठेत घडली आहे. मोड आलेले हरभरे खाल्ल्याने चिडलेल्या पत्नीने पतीला थेट लाटण्याने धोपटून काढले. एवढेच नव्हे तर त्याच्या डोक्यात मिक्सरचे भांडे घातले. करंगळीचा चावा घेत त्याच्या बोटाचे नखच तोडून टाकले. या घटनेप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पतीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांचा साधारण १६-१७ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगी असून ती दहावीमध्ये शिकण्यास आहे. ४४ वर्षीय पती पुणे जिल्ह्यातील एका गावात शेती करतात. तर, ४० वर्षीय पत्नी गृहीणी आहे. त्यांच्यामध्ये कौटुंबिक वाद सुरू आहेत. रविवार, १ डिसेंबर रोजी पत्नीने हरभरे भिजवून ठेवलेले होते. हे हरभरे पतीने खाल्ले. त्यावरून पत्नीने त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली. पतीला शिवीगाळ केली. यावरून, त्यांच्यामध्ये वाद झाले. या वादाचे पर्यावसन भांडणात झाले.
त्यावेळी पत्नीने पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. तिने लाटण्याने त्याच्या हातावर, पाठीवर, डोक्यात आणि मानेवर मारहाण केली. त्यानंतर, त्याच्या डोक्यात लाटणे मारले. लाटण्याचा मारापासून वाचण्यासाठी त्याने दोन्ही हात वर केले. तसेच, चेहऱ्यावर, गालावर, डाव्या कानाच्या पाठीमागे, पोटावर उजव्या बाजूला नखांनी ओरखडले. दरम्यान, पतीने तिच्या हातातील लाटणे हिसकावून घेतले. त्यावेळी देखील एवढी मारहाण करूनही तिचा राग शांत झाला नाही. त्यानंतर, , चिडलेल्या पत्नीने त्याच्या डोक्यात दोन वेळा मिक्सरचे भांडे घातले. त्यामुळे त्याच्या डोक्याला इजा झाली.
तिने रागाच्या भरात पतीला खाली ओढले. खाली बसलेल्या पतीने डोके वाचवण्यासाठी दोन्ही हात वर केले असता तिने पतीच्या करंगळीचा कडकडून चावा घेतला. त्याच्या करंगळीचे नख तोडून टाकले. पत्नीकडून झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या पतीने पोलिसांकडे धाव घेत आपली कैफियत मांडली. त्याची अवस्था पाहून पोलिसांनाही क्षणभर काय करावे सुचेनासे झाले होते. पोलिसांनी पतीच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवला असून तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी गंभीर दुखापत केल्याप्रकरणी ४० वर्षीय पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार परीट करीत आहेत.
पोलीस अधिकारी काय म्हणाले?
तक्रारदायर पती शेती करतो. तर, पत्नी गृहीणी आहे. त्यांच्यामध्ये कौटुंबिक वाद आहेत. घरातील मोड आलेले हरभरे खाल्ल्याने चिडलेल्या पत्नीने मारहाण केल्याची तक्रार पतीने दिली आहे. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला असून आमचा तपास सुरू आहे.
-उमेश गित्ते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस ठाणे
दुसऱ्या एका घटनेत पत्नीने पतीच्या अंगावर ओतले होते उकळते पाणी
पुण्यातील वारजे माळवाडी भागात घरात झोपलेल्या पतीच्या अंगावर पत्नीने उकळते पाणी टाकले होते. या घटनेत पती गंभीर जखमी झाला होता. पत्नीच्या भावाला उसने दिलेले पैसे परत मागत असल्यावरून पत्नीने पतीला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. जखमी व्यक्तीने पत्नीच्या भावाला काही रक्कम उसणी दिली होती. मात्र, मेव्हणा ती रक्कम परत देत नव्हता. त्यामुळे पती चिडला होता. पती आपल्या भावाकडे सतत पैसे मागतो या कारणावरून चिडलेल्या पत्नीने त्याच्या अंगावर उकळते पाणी टाकले होते.




