
शेती क्षेत्रातील एकट्या घर-गोठ्याच्या सुरक्षेसाठी वन विभागामार्फत उपक्रम
पुणे : बिबट्याप्रवण क्षेत्रात ग्रामस्थांच्या आणि पाळीव जनावरांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न असतो. बिबट्या कधी हल्ला करेल आणि घात होईल हे सांगता येत नाही. विशेषत: शेती क्षेत्रात निर्जनस्थळी असलेल्या एकट्या घर-गोठ्याच्या बाबतीत असे प्रसंग अनेकदा घडतात. त्यामुळे जी घरे एकांतात आहेत तेथील माणसांच्या आणि जनावरांच्या सुरक्षेसाठी ‘सौर कुंपण’ नावाच्या उपकरणाचा वापर केला जाऊ लागला आहेत. या सौर कुंपणामध्ये विशिष्ट क्षमतेचा इलेक्ट्रिक करंट सोडण्यात येत असून जर या तारेला प्राण्यांचा जर स्पर्श झाला तर जोरात झटका बसतो व त्या ठिकाणी पुन्हा ते प्राणी येत नाहीत.
जुन्नर तालुक्यातील वाढती बिबट समस्या लक्षात घेता ज्या ठिकाणी एकांतात घरे आहेत तेथील माणसांना बिबट्यापासून सुरक्षित उपाय योजना म्हणून या सौर कुंपणाचा वापर करण्यात येत आहे. जुन्नर वन विभागातील कांदळी नगदवाडी येथे उभारण्यात आलेल्या बेस कॅम्पमध्ये या संबंधीचे प्रशिक्षण देण्यात आले. जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या संकल्पनेतून वनपरिक्षेत्र जुन्नर-ओतुर परिक्षेत्रामधील अधिकारी व कर्मचारी तसेच बिबट रेस्क्यू टीम सदस्य यांच्यासाठी सौर कुंपणाबाबतच्या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस, ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ, जुन्नर, ओतुर वनपरीक्षेत्रातील वनपाल, वनरक्षक, वनमजूर व रेस्क्यू मेंबर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकांतात असलेल्या घरांना हे सौर कुंपण बसवले गेले, तर तेथील कुटुंबाचे बिबट्यापासून रक्षण होऊ शकते. या उपकरणाचे मूल्य ३० हजार रुपये असून त्यावर ७५ टक्के सबसिडी या कुटुंबांना दिली जाणार आहे. घरटी फक्त २५ टक्के रक्कमच भरावी लागणार आहे. परंतु, घराभोवती ठराविक अंतरावर खड्डे खोदून त्यामध्ये खांब रोवण्याचे काम संबंधित कुटुंबालाच करून घ्यावे लागणार आहे. याबाबत संपूर्ण तांत्रिक माहिती पुरवून त्यासाठी आवश्यक ती मदत वन विभागाचे कर्मचारी करणार आहेत. या उपाय योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतच्या ग्रामसभा ठरावामध्ये घरमालकाचे नाव असणे अनिवार्य आहे. तसेच २५ टक्के रक्कम लाभार्थीने भरणे बंधनकारक आहे.
संबंधित कुटुंबास या उपक्रमाबाबत तांत्रिक माहिती दिली जाणार आहे. या कुंपणाच्या देखरेखीची जबाबदारी संबंधित कुटुंबाची असेल असे उपवनसंरक्षक सातपुते म्हणाले. शेतकऱ्यांना या सौरकुंपनाबाबत अधिकाधिक माहिती मिळावी व शंकांचे समाधान व्हावे याकरिता वनपाल, वनरक्षक, वनमजूर व रेस्कू टिमला प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये विशेष करून झटका मशीन, बॅटरी, सौरऊर्जा प्लेट व सौर कुंपण कसे कार्य करते याबाबत विस्ताराने माहिती देण्यात आली.







