पोलीस भरतीतील बोगस ‘क्रीडा प्रमाणपत्र’ घोटाळा उघड! कुराश संघटनेचे पदाधिकारी, एजंट अन् अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

५ टक्के सरकारी नोकरीचे आरक्षण लाटण्यासाठी भरवल्या कागदोपत्री बोगस स्पर्धा; गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गैरव्यवहार उघड!
पुणे: महाराष्ट्र पोलीस भरती आणि शासकीय सेवेत ५ टक्के क्रीडा आरक्षणाचा बेकायदेशीर लाभ मिळवण्यासाठी ‘कुराश’ या खेळाची बनावट आणि बनावट तारखांची प्राविण्य प्रमाणपत्रे वाटणाऱ्या रॅकेटचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. न झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धा कागदोपत्री दाखवणे, जिल्हा बदलांच्या तारखांनंतर बनावट लेटरहेड बनवणे आणि ५ वर्षे आधीच किंवा २ वर्षे उशिरा शिफारस पत्रे पाठवून बोगस प्रमाणपत्रे तयार करण्याचा हा महाघोटाळा समोर आला आहे. याप्रकरणी पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-१ ने तपास करून गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१६ ते २०२६ या तब्बल १० वर्षांच्या कालावधीत शिवाजीनगर पोलीस मैदान, बालेवाडी क्रीडा संकुल आणि महाराष्ट्रातील विविध स्पर्धांच्या ठिकाणी घडला.
महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचा अध्यक्ष अंकुश विठ्ठल नागर (वय ४०, सध्या रा. चंदीगड; मूळ रा. अहिल्यानगर), सचिव शिवाजी जयवंत साळुंखे (वय ४६, रा. फुरसुंगी, हडपसर, पुणे व कोल्हापूर), जिल्हा पदाधिकारी कल्याण बाळासाहेब मुरकुटे (वय ३८, रा. शिरसम, ता. गंगाखेड, जि. परभणी), चांदपाशा लालासाहेब शेख (वय ३३, रा. कुन्हाळी, ता. उमरगा, जि. धाराशिव), कुराश जिल्हा संघटनांचे इतर जिल्ह्यांचे संघटक, खोटी प्रमाणपत्रे मिळवणारे सर्व खेळाडू, प्रमाणपत्र मिळवून देणारे मध्यस्थ (एजंट) आणि पडताळणी न करता प्रमाणपत्रे प्रमाणित करणारे शासकीय सक्षम क्रीडा अधिकारी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक दीपक माणिकराव लगड यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४) (फसवणूक), ३३८, ३३९, ६१(२), ३३६(३), ३४०(२) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याचे ‘धाराशिव’ आणि औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर १५ सप्टेंबर २०२३ रोजी लागू झाले. मात्र, २०१९, २०२१ आणि २०२२ च्या जुन्या स्पर्धांसाठी पाठवलेल्या शिफारस पत्रांवर २०२३ नंतरची ‘धाराशिव’ व ‘छत्रपती संभाजीनगर’ ही नावे वापरण्यात आली. यावरून ही पत्रे स्पर्धा संपल्यानंतर आणि नामांतर झाल्यानंतर मागेल त्या तारखेत बनवण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
६ व ७ ऑगस्ट २०२५ रोजी सिंहगड इन्स्टिट्यूट (आंबेगाव, पुणे) येथे झालेल्या राज्यस्तरीय कुराश स्पर्धेतील महिलांच्या (४४ किलो) वजनी गटाच्या निकालपत्रकात ‘मयूर ए. राजगे (सातारा)’ या मुलाचे नाव टाकून त्याला महिलांच्या गटात प्राविण्य प्रमाणपत्र देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. १३ सप्टेंबर २०२३ च्या स्पर्धेसाठी खेळाडूंची यादी ५ वर्षे आधी (२० जून २०१८ रोजी) पाठवली! २०२५ च्या स्पर्धेसाठी २ वर्षे ३ महिने आधीच यादी पाठवली. जळगाव, ठाणे, गोंदिया, पिंपरी-चिंचवड आणि धुळे या जिल्ह्यांच्या संघटनांनी स्पर्धा संपल्यानंतर १ ते ३२ दिवसांच्या उशिराने खेळाडूंची नावे पाठवून त्यांना पदके व प्रमाणपत्रे बहाल केली.
परभणी जिल्हा संघटनेत २०२३-२४ मध्ये अध्यक्ष झालेल्या बाळासाहेब कचरे व सचिव कल्याण मुरकुटे यांच्या सह्या सन २०१६, २०१८, २०१९ व २०२१ च्या जुन्या शिफारस पत्रांवर आढळल्या. म्हणजेच जुन्या स्पर्धांच्या नावाखाली नवीन पदाधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून दिली. परभणी जिल्हा कुराश संघटनेची अधिकृत नोंदणी १९ जुलै २०१९ (रजि. नं. ००१६९९९) रोजी झाली होती. मात्र, २०१६ आणि २०१८ च्या जुन्या पत्रांवर हा २०१९ चा नोंदणी क्रमांक छापून बनावटगिरी करण्यात आली.
या संपूर्ण प्रकरणात कोणत्याही स्पर्धा प्रत्यक्ष न घेता कागदोपत्री स्पर्धा भरवून, पात्र नसलेल्या उमेदवारांना प्राविण्य प्रमाणपत्रे वाटण्यात आली. शासकीय क्रीडा अधिकाऱ्यांनी या प्रमाणपत्रांची कोणतीही शहानिशा न करता ती प्रमाणित करून दिली, ज्यामुळे बोगस उमेदवारांनी पोलीस भरती व इतर सरकारी नोकऱ्यांमध्ये ५ टक्के क्रीडा आरक्षणाचा बेकायदेशीर लाभ मिळवून शासनाची व खऱ्या गुणवंत खेळाडूंची मोठी फसवणूक केली. या महाघोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली असून यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी, शासकीय अधिकारी, क्रीडा चालक आणि दलाल गजाआड होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-३) शंकर खटके करत आहेत.
#PuneCrime #SportsCertificateScam #PoliceRecruitment #KurashAssociation #PunePolice #CrimeBranch #BreakingNews #JobScam #MaharashtraNews #MarathiNews
