
तब्बल ११ उच्च शिक्षित आणि उच्चभ्रू महिलांना ओढले प्रेमाच्या जाळ्यात
नवी मुंबई : राज्यात नाशिकच्या सिन्नरमधील अशोक खरात या भोंदूचे कारनामे गाजत असतानाच आता आधुनिक लखोबा लोखंडे चर्चेत आला आहे. नवी मुंबई पोलिसांनी तोतया शास्त्रज्ञाला अटक केली असून त्याने विविध मेट्रोमोनियल साईट्सवर नाव नोंदणी करून राज्यातील ११ पेक्षा अधिक उच्च शिक्षित आणि उच्चभ्रू महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक केली. तसेच, त्यांच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने इस्रोमध्ये शास्त्रज्ञ, डॉक्टर किंवा उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी या महिलांना केली होती.
आदर्श म्हात्रे (वय २१) असे आरोपीचे नाव आहे. म्हात्रे केवळ दहावी उत्तीर्ण आहे. त्याने विवाह जुळवणाऱ्या विविध संकेतस्थळांवर तसेच सोशल मीडियावर १२ बनावट खाती (प्रोफाइल) तयार केली होती. कधी इस्रोचा शास्त्रज्ञ, बँकेचा अधिकारी, डॉक्टर तर कधी ‘पीडब्ल्यूडी’मध्ये उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी तो महिलांना करायचा.
त्याने स्वप्नील वारुळे, हेमंत गायकर, नहुश म्हात्रे, रूद्रेश गोंधळी आदी बनावट नावे धारण केली होती. त्याने अत्यंत हुषारीने उच्च पदस्थ महिला, डॉक्टर, अभियंता, बँक अधिकारी अशा गलेलठ्ठ पगार असलेल्या उच्चशिक्षित महिलांना लक्ष्य केले. त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित केल्यानंतर गोड बोलून विश्वास संपादन करायचा. त्यांच्याशी जवळीक साधून शरीरसंबंध प्रस्थापित करायचा. महिलेचा विश्वास बसला की वैयक्तिक अथवा व्यावसायिक अडचणी असल्याचे सांगत त्यांच्याकडून लाखों रुपये उकळत होता.
तो एवढा सरावलेला होता एखाद्या महिलेकडून उकळलेले पैसे दुसऱ्या महिलावर खर्च करायचा. यासोबतच स्वत: मौजमजा व चैन करण्यासाठी खर्च करीत होता. यासोबतच त्याला कॅसिनोमध्ये जुगार खेळायचा नाद होता. त्याने नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड, नागपूर आणि यवतमाळ अशा विविध जिल्ह्यातील महिलांना जाळ्यात ओढल्याचे समोर आले आहे. आत्तापर्यंत त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यांत ११ गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिस निरीक्षक सुनील शिंदे आणि त्यांच्या पथकाने शिताफीने त्याला अटक केली. या कारवाईकरिता तांत्रिक विश्लेषणाची मदत घेण्यात आली.
त्याने शोषण केलेल्या महिलांचा आंकडा वाढण्याची शक्यता असून बेअब्रू होण्याच्या भीतीने पीडित महिला तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलांनी विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळांवरील व्यक्तीची पूर्ण खातरजमा करावी. अनोळखी व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करू नयेत. महिलांनी न घाबरता समोर येऊन तक्रार दाखल करावी, असे आवाहन सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी केले आहे.






