
एमडी ड्रगचे तीन कारखाने उद्ध्वस्त; ५५ कोटी ८८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुणे / बंगळूर : महाराष्ट्र शासनाने अंमली पदार्थांची विक्री, पुरवठा व वितरण यामध्ये गुंतलेल्या व्यक्तींवर प्रभावी फौजदारी कारवाई करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्रने कर्नाटकातील बंगळूर येथे एमडी (मेफेड्रोन) ड्रगविरोधात अत्यंत मोठी आणि निर्णायक कारवाई करत तीन बेकायदा एमडी ड्रग कारखाने पूर्णतः नष्ट केले आहेत. या कारवाईत एकूण ५५ कोटी ८८ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कोकण कृती गटाने दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी नवी मुंबईतील वाशी गाव परिसरात, पुणे–मुंबई महामार्गालगत असलेल्या जुन्या बस डेपो येथे छापा टाकून अब्दुल कादर रशीद शेख याच्याकडून १ किलो ४८८ ग्रॅम एमडी ड्रग्ज (किंमत अंदाजे १ कोटी ४८ लाख ८० हजार रुपये) जप्त केले होते. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्या. आरोपीची चौकशी व तांत्रिक विश्लेषणातून बेळगाव येथील प्रशांत यल्लापा पाटील हा एमडी ड्रग तयार करणारा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपासात एमडी ड्रग बंगळूर शहरातील तीन कारखान्यांमध्ये तयार केले जात असल्याची माहिती समोर आली.
महाराष्ट्र एएनटीएफच्या पथकाने बंगळूर गाठत राजस्थानचे कायमचे रहिवासी पण सध्या बंगळूरमध्ये एमडी ड्रगचा अवैध व्यवसाय करणारे सुरज रमेश यादव आणि मालखान रामलाल बिश्नोई यांना ताब्यात घेतले. आरोपींच्या कबुलीनुसार पोलिसांनी बंगळूर शहरातील स्पंदना लेआउट कॉलनी (एनजी गोलाहळी) येथील आर. जे. इव्हेंट नावाचा कारखाना आणि येरपनाहळी, कन्नूर येथील लोकवस्तीतील एका आरसीसी घरामधील कारखाना अशा तीन ठिकाणी धडक छापे टाकले.
या छाप्यांमध्ये पोलिसांनी ४ किलो १०० ग्रॅम घन स्वरूपातील एमडी, १७ किलो द्रव स्वरूपातील एमडी असा एकूण २१ किलो ४०० ग्रॅम एमडी ड्रग, तसेच एमडी तयार करण्यासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री, विविध रसायने, साहित्य जप्त केले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ५५ कोटी ८८ लाख ९० हजार रुपये इतकी आहे. तिन्ही ठिकाणचे एमडी तयार करणारे कारखाने पूर्णतः उद्ध्वस्त करण्यात आले.
प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे की, या तीन कारखान्यांमध्ये तयार होणारे एमडी ड्रग भारताच्या अनेक राज्यांमध्ये वितरित केली जात होती. तसेच एमडी ड्रगच्या विक्रीतून आरोपींनी बंगळूर शहरात मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, या रॅकेटमधील महत्त्वाचे दोन आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत.
ही कारवाई सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक सुनील रामानंद, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्रच्या विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत, पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे कृती गटाचे पोलीस अधीक्षक एम. एम. मकानदार, अपर पोलीस अधीक्षक कृष्णात पिंगळे, कोकण कृती गटाचे पोलीस उपाधीक्षक रामचंद्र मोहिते, पोलीस निरीक्षक संतोष गावशेते, पोलीस निरीक्षक निलेश बोधे, सहायक पोलीस निरीक्षक उदय काळे, माधवानंद धोत्रे, उमेश भोसले, पोलीस उपनिरीक्षक संजय आदलिंग, सुहास तावडे, सहायक फौजदार अनिल पास्ते, अशोक आटोळे, पोलीस हवालदार महेश गवळी, जितेंद्र चव्हाण, योगीराज इंगुळकर, अनिल मोरे, जितेंद्र तुपे, शिवाजी रावते, अर्जुन बंदरे, पोलीस शिपाई मनीष भोईर इत्यादींनी केली.







