
पुणे : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या बेकायदा पार्ट्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारला असून, विमाननगर परिसरातील ‘द नॉयर’ पबवर शनिवारी पहाटे मोठी धाड टाकण्यात आली. या कारवाईत महिला व पुरुष अशा एकूण ५० जणांना ताब्यात घेण्यात आले असून, पब मालक अमरजित सिंग संयु याच्यासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विमाननगर येथील एअरपोर्ट रोडवर असलेल्या ‘द नॉयर (रेड जंगल)’ या पबमध्ये कोणताही अधिकृत परवाना न घेता पार्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांना मिळाली होती. त्यानुसार कानडे आणि त्यांच्या पथकाने पहाटे छापा टाकत कारवाई केली.
छाप्यादरम्यान पबमध्ये विदेशी मद्याच्या तब्बल १७८ बाटल्या आढळून आल्या. याशिवाय अवैध मद्यविक्री व पार्टीसाठी वापरण्यात येणारे साहित्य— खुर्च्या, सोफा, लाकडी टी-पॉय, लोखंडी रचना, स्पीकर, साऊंड सिस्टिम, लॅपटॉप, संगणक, काचेचे ग्लास, फॉग मशीन आदी जप्त करण्यात आले. या कारवाईत सुमारे ३ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणात एकूण ५२ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, त्यापैकी पब चालक व व्यवस्थापक अशा दोन आरोपींचा शोध सुरू असून त्यांना फरार घोषित करण्यात आले आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर पार्ट्यांचे आयोजन केले जात असताना, नियम डावलून बेकायदा कार्यक्रम होऊ नयेत यासाठी उत्पादन शुल्क विभागाने २१ भरारी पथके तैनात केली असल्याची माहिती अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.







