
द लखन टॉकचा दणका : पालिका प्रशासनाने बदलला निर्णय
पुणे : शहरातील सर्वात मोठ्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी मिळणाऱ्या पासची सुविधा बंद ठेवण्यात आली होती. याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक निवडणूक कामासाठी करण्यात आल्याने हे केंद्र बंद ठेवण्यात आले होते. याबाबतचे वृत्त ‘दलखनटॉक’ने प्रसिद्ध करताच पालिकेने हा निर्णय बदलला असून हे पास केंद्र सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, या केंद्रातील सेवा रविवारपासून पुन्हा सुरु करण्यात आली.
पुणे महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली आहे. प्रशासनाकडून निवडणुकीची मोठ्या प्रमाणावर तयारी सुरु करण्यात आली आहे. पालिकेच्या विविध विभागातील मनुष्यबळ निवडणुकीच्या कामासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्यानुसार, वैकुंठ स्मशानभूमीमधील मनुष्यबळ देखील निवडणुकीच्या कामाला जुंपण्यात आलेले होते. तसा आदेश प्राप्त झालेला होता.
वैकुंठ स्मशानभूमी हि शहरातील सर्वात मोठी स्मशानभूमी आहे. संपूर्ण शहरातून याठिकाणी अंत्यविधीसाठी मृतदेह आणले जातात. अनेकजण वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यासाठी आग्रही असतात. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीकरिता मयत पास घेणे बंधनकारक आहे. शहरातील विविध भागात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याठिकाणी अडचण असल्यास किंवा ही केंद्र बंद असल्यास वैकुंठ स्मशानभूमीमधून पास घेण्याची सुविधा आहे. वैकुंठ स्मशानभूमीत अनेकदा मृतदेह आणून इथेच पास काढून अंत्यविधी केले जातात.
मात्र, कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाची जबाबदारी देण्याच्या आदेशामुळे हे केंद्र बंद ठेवण्यात आलेले होते. याबातची बातमी ‘द लखन टॉक’ने प्रसिद्ध करताच हा निर्णय बदलण्यात आला असून हे केंद्र सुरु ठेवण्यात आले आहे.






