
दिग्गज नेत्यांच्या ताकदीला शह देत स्थानिक पातळीवरील आघाडीचा विजय
पुणे : पुण्यामध्ये पोलीस आयुक्त म्हणून काम केलेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने दणदणीत विजय मिळवीत नगराध्यक्षपद खेचून आणले. दिग्ग्ज नेत्यांच्या ताकदीला शह देत स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेल्या ‘यादव आघाडी’ने १५ जागा जिंकत विजय खेचून आणला. विशेष म्हणजे त्या एका शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा आहेत. त्यांच्या विजयामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे.
पुण्याचे माजी पोलीस आयुक्त आणि सेवानिवृत्त पोलीस अधिकारी गुलाबराव पोळ यांच्या पत्नी विद्या पोळ यांचा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी विजय झाला आहे. पेठ वडगावमध्ये नगराध्यक्षपदासाठी यादव आघाडी तयार करण्यात आली होती. या आघाडीकडून विद्या पोळ यांनी निवडणूक लढविली. या आघाडीविरोधात जनसुराज्य शक्ती पक्ष-ताराराणी आघाडी लढली. मात्र, एकूण २० जागांसाठी झालेल्या मतदानात यादव आघाडीने १५ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले, तर जनसुराज्य-ताराराणी आघाडीला ५ जागांवर समाधान मानावे लागले.
विद्या पोळ या गुलाबराव पोळ यांच्या पत्नी अशी एकमेव ओळख नाहीये. तर, त्या पेठवडगावमधील डॉ. सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कुलच्या चेअरपर्सन आहेत. त्यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख आणि जनसंपर्क देखील आहे. निकालानंतर त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून, गुलाल उधळून आणि घोषणाबाजी करत जल्लोष केला.
विद्या पोळ यांनी नगराध्यक्षपदाच्या प्रतिस्पर्धी असलेल्या जनसुराज्य-ताराराणी आघाडीच्या उमेदवार प्रविता सालपे यांचा पराभव केला. पोळ यांना २१६५ मते मिळाली. विजयाचा गुलाल उधळल्यानंतर विद्या पोळ यांनी पेठवडगावचा सर्वांगीण विकास करणे, नागरिकांसाठी अधिकाधिक सुविधा निर्माण करणे, सर्वसमावेशक कामे करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.






