
पुणे : हडपसरमधील सय्यदनगर परिसरात दहशत माजविणाऱ्या कुख्यात टिपू पठाण टोळीतील दोन फरार गुंडांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. टिपू पठाण टोळीविरुद्ध यापूर्वीच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्या कारवाईनंतर पसार झालेल्या या दोन आरोपींना अखेर पोलिसांनी गजाआड केले.
साजीद झिब्राइल नदाफ (वय २७, रा. वेताळबाबा वसाहत, गाडीतळ, हडपसर) आणि इरफान नासीर शेख (वय २७, रा. सय्यदनगर, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मकोका कारवाईनंतर दोघेही फरार झाले होते आणि पोलिसांना गुंगारा देत होते.
गुन्हे शाखेच्या पथकाला दोघेही हडपसरमधील त्यांच्या घराकडे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. ही कारवाई पोलीस उपायुक्त निखील पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पोलीस निरीक्षक छगन कापसे, उपनिरीक्षक अभिजित पवार आणि त्यांच्या पथकाने केली.
टिपू पठाण आणि त्याच्या साथीदारांविरोधात हडपसर परिसरात गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. सय्यदनगर भागात एका महिलेची जमीन बळकावून तिच्यावर बेकायदा ताबा मिळवणे, तसेच तो ताबा सोडण्यासाठी २५ लाख रुपयांची खंडणी मागणे, असा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हडपसर, वानवडी परिसरात पठाण टोळीची दहशत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले असून, टोळीतील इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.







