
जागतिक अपंग दिनानिमित्त १०० दिव्यांगांना धान्य किट वाटप
पुणे : समाजातील वंचित, दुर्लक्षित आणि दिव्यांग बांधवांसाठी संवेदना व कृतिशील मदतीचा हात पुढे करत स्वराज्य ग्रुप तर्फे जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधत १० डिसेंबर रोजी १०० दिव्यांग व्यक्तींना धान्य किट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने आयोजित हा उपक्रम दिव्यांग बांधवांसाठी आधार देणारा ठरला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पर्वती भागाचे कार्यवाह दर्शनजी मिरासदार यांनी भूषवले. संघाला १०० वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने स्वराज्य ग्रुपनेही १०० दिव्यांगांना मदत करण्याची पुढाकार घेतल्याबद्दल आनंद व्यक्त करत त्यांनी सांगितले,
“समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचला पाहिजे. दिव्यांग बांधवांसाठी स्वराज्य ग्रुपने घेतलेली ही पुढाकार प्रशंसनीय आहे.”
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सावरकर नगर संघचालक विवेक हरिदास, माजी नगरसेविका राजश्री शिळीमकर, प्रविण चोरबेले, राम मोरे, प्रसाद खंडागळे, राहुल लोंढे, हेमंत देशपांडे, पोपट माने, तसेच स्वराज्य ग्रुपचे संस्थापक भरत मोरे, अध्यक्ष सागर निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्वराज्य ग्रुपचे कार्यकर्ते गौतम पुटगे, राहुल नाटेकर, संतोष गालफाडे, अमित क्षिरसागर, नागेश गायकवाड, मयूर तळेकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. परिसरातील अनेक दिव्यांग नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाची स्मितरेषा उमटवत, समाजातील उपेक्षित घटकांसाठी संवेदनशीलता वाढवणारा हा उपक्रम उल्लेखनीयपणे पार पडला.







