
हमाल भवन बाहेर लावले चाफ्याचे झाड : झाडाच्या मुळाशी अस्थी विसर्जित
पुणे : कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर झगडणारे, श्रमिकांच्या वेदना स्वतःच्या हृदयात जपणारे आणि अन्यायाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिलेले श्रमिकांचे नेते, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या अस्थींचे अनोख्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले. आयुष्यभर दुसऱ्यांना चाफ्याची फुले भेट देणाऱ्या बाबांच्या अस्थी कोणत्याही धार्मिक विधीशिवाय बुधवारी विसर्जित करण्यात आल्या. मार्केट यार्ड येथील हमाल भवनच्या बाहेर बाबांच्या स्मृतीप्रित्यर्थ चाफ्याचे झाड लावण्यात आले. या झाडाच्या मुळाशी त्यांच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या.
यावेळी त्यांची मुले असीम आणि अंबर, पत्नी शीला, लक्ष्मी नारायण, पौर्णिमा चिकरमाने, संतोष नागरे, गोरख मेंगडे (हमाल पंचायत), रिक्षा पंचायत नितीन पवार, शारदा वाडेकर, स्वच्छ आणि केकेपीकेपी लुब्ना अनंतकृष्णन, हर्षद बर्डे, योगेश मंजुळा, सुमन मोरे, राणी शिवशरण, विद्या नाईकनवरे, विविध संघटनांचे, हमाल, माथाडी, रिक्षा पंचायतीचे सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब पांडुरंग आढाव ऊर्फ बाबा आढाव (वय ९६) यांचे सोमवारी रात्री आठ वाजून २५ मिनिटांनी उपचारादरम्यान हृदयविकाराने निधन झाले. बाबांचे पार्थिव मंगळवारी सकाळी दहा वाजता पुण्यातील मार्केट यार्ड येथील हमाल भवनात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सायंकाळी नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत कोणताही धार्मिक विधी न करता विद्युतदाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी दिवसभर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आंबेडकरी आणि डाव्या चळवळीतील विविध लोकांनी रीघ लावली होती.
त्यांच्या पश्चात पत्नी शीला, मुले असीम आणि अंबर असा त्यांचा परिवार आहे. फुप्फुसाच्या संसर्गामुळे २४ नोव्हेंबर रोजी त्यांना नवी पेठेतील पुना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेली पंधरा दिवस ते अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. प्रकृतीत चढ-उतार सुरू असतानाच सोमवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.






