
बापाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुणे : पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाल्यानंतर एका महिलेने दूसरा विवाह केला… आपल्या दोन लहान मुलींना वडिलांचे छत्र आणि प्रेम मिळेल या भाबड्या आशेने महिला सासरी नांदण्यास आली. संसाराला हातभार लावण्याकरिता तिने देखील नोकरी पत्करली… आपल्या पतीच्या छायेत मुली सुरक्षित असल्याची तिची भावना होती.. . मात्र, हाच नराधम बाप या मुलींचे लचके तोडत होता… त्यांच्याकडून नको नको ती अश्लाघ्य कृत्य करवून घेत होता. पिडीत मुलींनी आईजवळ आपल्यावर होत असलेल्या अत्याचारांचा पाढा वाचल्यानंतर सर्व प्रकार उजेडात आला. विमानतळ पोलिसांनी या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी ३२ वर्षीय नराधम सावत्र बापाला अटक केली असून त्याच्यावर भान्यासं ६४, ६५ (१), ७४, ७५, ७६, ३४९ (२) (३), सह पोक्सो ४,६,९ (एल) (एन), १०, १२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा प्रकार २०१७ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घडला. याप्रकरणी पिडीत मुलींच्या आईने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिडीत मुलींमध्ये १५ वर्षे आणि १४ महिने वयाच्या दोन मुलींचा समावेश आहे. आरोपी मूळचा फुरसुंगी येथील राहणारा आहे. तर, पिडीत मुलींची आई पर जिल्ह्यातील राहणारी आहे. या महिलेचे पुण्यातील एका व्यक्तीशी काही वर्षांपूर्वी लग्न झालेले होते. मात्र, काही वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला. या दाम्पत्याला दोन मुली आहेत.
घटस्फोट झाल्यानंतर या महिलेने आरोपीसोबत दूसरा विवाह केला. त्यानंतर, ही सर्व जण एकत्र राहात होते. पिडीत महिलेच्या दोन मुली देखील सोबत रहात होत्या. या मुलींची आई कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर आरोपी या दोन्ही मुलींना अंग दाबायला लावत असे. तसेच, तेलाने गुप्तांगाला मसाज करायला लावत असे. त्यांना मांडीवर बसवून अश्लील चाळे करीत होता. लहान मुलीवर त्याने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचे देखील फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पिडीत मुलींनी घाबरून ही गोष्ट आईला सांगितली नव्हती. आरोपीने त्यांना ‘तुझ्या मम्मीला सांगितल्यास मम्मीला व तुम्हाला मारेन व तुमच्या पहिल्या वडिलांकडे सोडून देईन अशी धमकी दिली होती. मात्र, त्याचे अत्याचार सहन झाल्यावर मुलींनी आईकडे याबाबत तक्रार केली आणि आपल्सोया नराधम पित्याचे काळे कारनामे उघड केले. पिडीत मुलींना घेऊन आईने थेट पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीला तात्काळ अटक केली.







